प्रभागनिहाय करणार पाहणी

0

भुसावळ। शहरात नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, दिवाबत्ती, अस्वच्छता, अतिक्रमण आदी समस्यांनी डोके वर काढले असून या समस्या सोडविण्यास सत्ताधारी अपयशी ठरत असल्या मुळे जिल्हाधिकार्‍यांनी शहरातील वस्तुस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी जनाधार पार्टीच्या नगरसेविका संगिता देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन पाहणी करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

नालेसफाईचे काम रखडले
शहरात बर्‍याच ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. जुलै महिना संपत आला असून बहुतांश भागात नालेसफाईचे काम रखडले आहे. त्यामुळे जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यास नाल्यालगत असलेल्या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरुन मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वसाधारण सभेचा विसर
निवडणूका होऊन एक वर्ष होत आहे. मात्र सत्ताधार्‍यांनी सर्वसाधारण मासिक सभा एकदाच घेण्यात आली आहे. तरी सर्वसामान्यांच्या हितासाठी सभा दर दोन महिन्यांनी घ्यावी अशी मागणी करुनही नगरपालिका प्रशासनातर्फे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मागील सभा 12 मार्च रोजी झाली होती. नियमानुसार सर्वसाधारण सभा 12 मे दरम्यान होणे आवश्यक होते. परंतु आजपर्यंत 12 जुलै उलटून गेली तरी सर्वसाधारण सभा घेण्यात आली नाही. 12 मार्च रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेचे प्रोसेडींग आजपर्यंत लिहले गेले नाही. अशा विविध विषयांवर जिल्हाधिकार्‍यांनी वस्तुस्थितीचा आढावा घेऊन मुख्याधिकारी व सत्ताधार्‍यांवर कार्यवाही करण्याची मागणी नगरसेविका देशमुख यांनी केली आहे.

रस्त्यांच्या दुरुस्तीकडे होतेय दुर्लक्ष
शहरात विकास कामांना ब्रेक लागलेला असताना मुख्याधिकारी दर पंधरा ते वीस दिवसांची सुटी टाकून बाहेर निघून जातात. मामाजी टॉकीज रोड, वरणगाव रोड, बसस्थानक परिसर, आरपीडी रोड भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असून यामुळे अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रस्तांच्या दुरुस्तीकडे सत्ताधार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याचे देशमुख यांनी निवेदनात नमूद केले आहे.

शहराचा दौरा करणार
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची भेट घेऊन नगरसेविका देशमुख यांनी शहरातील समस्यांसंदर्भात छायांकित अहवाल सादर केला. तसेच जळगाव शहराप्रमाणे भुसावळ शहरातही स्वच्छतेची मोहिम राबवून विकास कामांच्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावरुन कार्यवाही करण्याची मागणी केली. या अहवालाची पाहणी करुन जिल्हाधिकार्‍यांनी हा विषय गांभिर्याने घेतला असून येत्या दोन दिवसात भुसावळ शहराचा दौरा काढण्यात येऊन शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन पाहणी करणार असल्याचे आश्‍वासन दिले.