जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत 4 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली आहे. तर प्रभागरचना प्रारूप सोमवार 9 रोजी प्रसिध्द करून प्रशासनाने प्रभागरचनेवर हरकती व सुचना मागविल्या असून पहिल्याच दिवशी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यासह पाच जणांच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्रभागरचना तयार करतांना नियमाचे उल्लंघन झाले असून नव्याने प्रभागरचना करावी, अशी हरकत घेण्यात आली आहे. महापालिकेच्या 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागरचनेवर दि.9 ते 24 एप्रिलपर्यंत हरकती व सुचना मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी मनपा आयुक्त कार्यालय आणि चारही प्रभाग समिती कार्यालयात स्वतंत्र कर्मचार्यांची नेमणुक करण्यात आली आहे. प्राप्त होणार्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी मनपा आयुक्त कार्यालयात पाच हरकती प्राप्त झाल्या असून चार ही प्रभाग समिती कार्यालयांमध्ये एकही हरकती प्राप्त झालेला नाही.
यांनी घेतली हरकत
प्रारुप प्रभाग रचनेवर विद्यमान अपक्ष नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी हरकत घेतली आहे. प्रभागरचना नियमानुसार करण्यात आलेली नाही. त्यामुळे नव्याने प्रभागरचना करावी, अशी हरकत त्यांनी घेतली आहे. शेख फिरोज शेख हुसेन, याकुब दाऊत खान, खलील बशिर पठाण यांच्यासह काही नागरिकांनी प्रभाग क्र.5 व 6 याबाबत हरकत घेतली आहे. इंदिरानगर, श्रीपतनगर, नयाफैल हा भाग प्रभाग क्र.6 मध्ये जोडण्यात यावा. तर निलेश तायडे यांनी अनुसुचीत जमाती आरक्षणबाबत हरकत घेतली आहे.