प्रभागाचा विकास नावालाच, प्रत्यक्षात मुलभूत सुविधांची वाणवा

0

प्रभाग क्र.13 मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया ः खराब रस्ते, धुळीमुळे सहनशक्तीचा अंत

जळगाव – शहराचा विस्तार होतोय, त्याप्रमाणे नागरिकांना मुलभूत सुविधाही दिल्या गेल्या पाहिजे. त्याप्रमाणे प्रभाग 13 मध्ये मोहन नगर, रायसोनी नगर असा भाग आहे. नावालाच हा परिसर विकसीत असल्याचे चित्र असून प्रत्यक्षात रस्ते, गटारी, पथदिवे अशा मुलभूत सुविधांची वाणवा आहेत. खराब रस्ते, त्यामुळे उडणारी धूळ सहन करता येत नाही आणि सांगता येत नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. कर वसूल करता मग सुविधा का देत नाही, असा सवालही यावेळी नागरिकांनी उपस्थित केला.

रस्त्यांची दयनीय अवस्था

प्रभाग 13 मध्ये त्र्यंबक नगर, हतनूर कॉलनी, आदर्श नगर (काही भाग), संभाजी नगर, मोहन नगर, विवेकानंदनगर, डॉ. जाकीर हुसेन कॉलनी, दौलत नगर, समता नगर (दक्षिण भाग), देवेंद्र नगर, रायसोनी नगर या परिसराचा समावेश आहे. यापैकी प्रभागतील काही भागाचा विकास झालेला आहे. तर काही भाग अजूनही मुलभूत सुविधांच्या बाबतीत भकास असल्याचे चित्र आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था असून नुसते खड्डे, खड्डे अन् खड्डेच अशी परिस्थिती आहे. या खराब रस्त्यांमुळे रस्त्यालगत घर असलेल्यांना दिवसभर धूळीचा त्रास सहन करावा लागतो.

पक्के नाही किमान मुरूमाचे तरी रस्ते करुन द्या

अवजड तसेच मोठ्या प्रमाणावर इतरही वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्याने तीन तेरा झाले आहे. चढ, उतार अशा ओबडधोबड रस्त्यावर वाहनच काय पण पायी चालणेही अवघड झाले आहे. ज्येष्ठ नागरिक चालतांना अनेकदा पडून किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या रस्त्यामुळे स्कूल व्हॅनही येत नसल्याची खंतही येथील नागरिकांनी व्यक्त केली. निवडून आल्यापासून नगरसेवक आलेलेच नाही. तक्रार केली की तेवढ्यापुरती पाहणी होते, यानंतर आज उद्यावर काम ढकलून ही समस्या आहे तशीच राहते. पक्के नाही पण किमान मुरूमाचे तरी रस्ते तयार करुन द्या, अशी केविलवाणी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.

गटारी निकृष्ट दर्जाच्या…त्यांचीही साफसफाई नाही

या परिसरातील काही भागांमध्ये गटारी तयार केलेल्या आहेत. तर काही भागात अद्यापही गटारी तयार केलेल्या नाहीत. नगरसेवकांकडून पाहणी करण्यात आली. गटारी करुन देण्याचे नेहमीप्रमाणे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र अद्यापर्यंत गटारी झाल्या नाहीत. ज्या गटारी बनविल्या आहेत. त्याही निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्याच्यातून पाण्याचा निचरा होत नाही. तसेच या गटारींची नियमित स्वच्छता केली जात नाही. केवळ करायच्या म्हणून करायच्या अशा पध्दतीने गटारी बनविल्या असल्याचेही येथील नागरिकांनी सांगितले.

फवारणी,धुरळणी नाहीच

गटारींचे अपूर्ण काम करण्यात आले आहे. तसेच नियमित साफसफाई होत नसल्याने गटारी तुंबल्याने साहजिकच डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. सफाई कर्मचार्‍यांना गटारींच्या साफ सफाईबद्दल बोलल्यास त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. याबाबत तक्रार केल्या, मात्र काहीही उपयोग झाला नाही. मोकळ्या जागांवर झाडेझुडपे वाढली आहेत, ही झुडपे अपूर्ण गटारींमध्ये पडतात. त्यामुळे पाणी जात नाही. पाणी साचल्याने दुर्गंधी पसरते. या घाणीच्या साम्राज्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. मोकळ्या जागांवर झाडेझुडपे काढण्यात यावीत अन्यता किमान डेंग्यूची साथ सुरु असल्याने धुरळणी,फवारणी तर करावी अशी अपेक्षा येथील नागरिकांनी केली.

माजी महापौर, माजी सभापतींच्या प्रभागाची दयनीय अवस्था

माजी महापौर, माजी स्थायी सभापतींचा हा प्रभाग आहे. काही परिसरामध्ये पिण्याचे पाणी व्यवस्थित येत नाही, कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. पथदिवे नाहीत. नगरसेवक पाहणी करत नाही, त्यांच्याकडे तक्रारी केल्यावर त्याकडे ते लक्ष देत नाही. महापालिकेकडूनही तक्रारींना केराची टोपली दाखविले जाते, मग तक्रार करायची तर कुणाकडे असा प्रश्नही येथील महिलांनी उपस्थित केला. तसेच केवळ मत मागायला येतात, मग सुविधा द्यायच्या वेळी कुठे गायब होतात? अशा शब्दात नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर रोष व्यक्त केला.