प्रभाग अधिकार्‍यांवर अतिक्रमण निर्मुलन जबाबदारी

0

जळगाव । शहरातील अतिक्रमण निर्मुलनाची जबाबदारी आता चारही प्रभाग अधिकार्‍यांना देण्यात येणार असून याकामी प्रभागनिहाय स्वतंत्र पथक देणार असल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली़ शहरातील अतिक्रमणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे़ मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून यासाठी सातत्याने कारवाई केल्यानंतरही अतिक्रमणाचा प्रश्न सुटेनासा झाला आहे़ त्यातच हॉकर्स यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यावरही हॉकर्सकडून स्थलांतराला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता चारही प्रभाग अधिकार्‍यांना आपापल्या प्रभागातील अतिक्रमण निर्मुलनाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याचेही आयुक्त यांनी सांगितले़

पुढील सुनावणीसाठी 26 एप्रिल रोजी
याकामी प्रत्येक प्रभागात स्वतंत्र पथक देण्यात येणार आहे़ बुधवार पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले़ दरम्यान, या निर्णयामुळे मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या कामाचा ताण हलका होणार आहे. अतिक्रमण निर्मुलनाची जबाबदारी प्रभाग अधिकार्‍यांना देण्यात येत असली तरी मोठ्या कारवाईचे नेतृत्व अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान हेच करतील़ दरम्यान, आहे त्या जागेवर व्यवसाय करू द्यावा, या मागणीसाठी हॉकर्सतर्फे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे़ या याचिकेवर मंगळवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली असता पुढील सुनावणीसाठी 26 एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे़ यामुळे मनपा कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.