पिंपरी-चिंचवड : सध्या शहरात पाणीकपात नसूनसुद्धा प्रभाग क्रमांक 10 मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पाणी पुरवठ्याच्या सातत्याने तक्रारी आहेत. या तक्रारींची सोडवणूक संबंधित अधिकार्यांकडून केली जात नाही. त्यामुळे भाजपचे स्थानिक नगरसेवक अनुराधा गोरखे व तुषार हिंगे यांनी शनिवारी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे गार्हाणे मांडले. हा प्रश्न सुटत नसेल तर, आमचा राजीनामा घ्या, असेही या नगरसेवकांनी सांगितले.
अधिकार्यांचे तक्रारींकडे दुर्लक्ष
शहरातील संभाजीनगर, शाहूनगर ,विद्यानगर, दत्तनगर, लालटोपीनगर, मोरवाडी, म्हाडा परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाणी पुरवठ्याच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. अनेक वेळा अधिकार्यांना सांगूनसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. सध्या शहरात पाणीकपात नसूनसुद्धा या भागात पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही, अशी तक्रार प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक अनुराधा गोरखे व तुषार हिंगे यांनी केली.
पाण्यावाचून नागरिकांचे हाल
पाणी पुरवठ्यासंदर्भात वेळोवेळी नागरिक आमच्याकडे तक्रार करतात. आम्ही अधिकार्यांना त्याबाबत सांगतो. परंतु, अधिकारी आणि कर्मचारी आजपर्यंत कधीच पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. पाण्यावाचून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. हा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी गोरखे व हिंगे यांनी केली. त्यावर लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.