प्रभाग चारमधील पोटनिवडणुकीत राजकुमार खरात यांची बिनविरोध निवड

0

भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील नगरसेवक रवींद्र खरात यांची हत्या झाल्यानंतर या प्रभागासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती मात्र सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी येथे उमेदवार न देता राजकुमार खरात यांना पाठिंबा दर्शवल्याने या जागेवर खरात व्यतिरीक्त कुणीही उमेदवारी दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीचे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी त्यांना दिले. यावेळी राजू सूर्यवंशी, नगरसेवक युवराज लोणारी, गटनेता उल्हास पगारे, माजी नगरसेवक संतोष बारसे, नगरसेवक अमोल इंगळे, रवी सपकाळे, दुर्गेश ठाकूर, राज खरात, सुनील सोनवणे, बाळा मोरे, भुरा सपकाळे, अ‍ॅड.निर्मल दायमा आदी उपस्थित होते.

प्रभाग 24 मध्ये तिरंगी लढत
प्रभाग 24 अ मधील नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी वेळेत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवल्यानंतर या प्रभागातही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या जागेवर शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी उमेदवारी उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज वैध ठरले आहे. भाजपा उमेदवार रेखा सोनवणे यांच्यातर्फे ठाकूर यांच्या उमेदवारी अर्जावर तर रेखा सोनवणे यांच्यातर्फे ठाकूर यांच्या वकिलांनी हरकती घेतल्या होत्या मात्र दोन्ही पक्षाच्या चर्चेनंतर हरकती फेटाळून तिघांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. यामुळे राष्ट्रवादीतर्फे दुर्गेश ठाकूर, भाजपतर्फे रेखा सोनवणे व शिवसेनेचे रवी चव्हाण यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.