प्रभाग चार पोटनिवडणूकीत 29 डिसेंबरला मतदान प्रक्रिया

0

12 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

भुसावळ: पालिकेचे प्रभाग चार- अ चे भाजप नगरसेवक रविंद्र खरात यांच्या हत्याकांडानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. बुधवारपासून (दि.4) ऑनलाइन नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरवात झाली असून 12 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केले जाणार आहेत. तर 29 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईल.

भाजप नगरसेवक रविंद्र खरात यांच्या खूनानंतर प्रभाग 4 अ साठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहिर केली आहे. बुधवारपासून नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरावे लागणार आहेत. यासाठी 12 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी अर्जांना प्रतिसाद मिळाला नाही. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैध झालेल्या नामनिर्देशीत झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. अर्जांवर हरकती किंवा अपील असल्यास 20 डिसेंबरपर्यंत करता येईल. जेथे अपील नसेल अशा ठिकाणी 18 डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत असेल. तसेच माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यांनतर चिन्ह वाटप केले जाईल. तर आवश्यकता असल्यास 29 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल व 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी होईल, या निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरु झाली आहे. दरम्यान भाजपकडूनही ही निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न सुरु झाले असून मृत नगरसेवक रविंद्र खरात यांच्या परिवारातील सदस्यांना संधी द्यावी, यासाठी प्रयत्न आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली.


प्रभाग 24 ची पोटनिवडणूक लागणार

प्रभाग 24 अ चे जनआधारचे नगरसेवक दुर्गेश नारायण ठाकूर यांना जात पडताडळणी प्रकरणी अपात्र करण्यात आले आहे. या प्रभागाची पोटनिवडणूक अद्याप जाहिर झाली नसली तरी या प्रभागाची प्रारुप मतदार यादी तयार करण्याबाबतच्या सूचना प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. प्रारुप मतदार यादीनुसार प्रभाग 24 अ मध्ये 9 हजार 400 मतदार आहेत. साधारण जानेवारी महिन्यात या प्रभागाचीही पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.