प्रभाग समितीवर ‘कमळ’ फुलले

0

भाजपात फूट : ‘जुने कार्यकर्ते सर्वच निराधार, शहरातील पार्टीला नाही कुणाचाच आधार’
आमदार महेश लांडगे यांचे भोसरी मतदार संघात निर्विवाद वर्चस्व

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या आठही प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपचे सदस्य निवडून आले. एका प्रभाग समितीवर तीन याप्रमाणे एकूण 24 जणांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली. मात्र, कमळ फुलले असले तरी भाजपामध्ये फुट पडली असून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दिवसभर उपोषण केले. तसेच आंदोलनस्थळी ‘जुने कार्यकर्ते सर्वच निराधार, शहरातील पार्टीला नाही कुणाचाच आधार’ असा फलक लावला. दरम्यान, भोसरी मतदार संघातील तीन समितीवर निवडी बिनविरोध झाल्या. यातून आमदार महेश लांडगे यांनी मतदार संघावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.

हे आहेत स्वीकृत सदस्य!
’अ’ प्रभाग राजेश सावंत, सुनील कदम, राजेंद्र कांबळे, ’ब’ प्रभाग बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर, देवीदास पाटील, ’क’ प्रभाग सागर हिंगणे, वैशाली खाडे, गोपीकृष्ण धावडे, ’ड’ प्रभाग चंद्रकांत भूमकर, संदीप नखाते, महेश जगताप, ’इ’ प्रभाग समितीवर अजित बुर्डे, साधना तापकीर, विजय लांडे, ’फ’ प्रभाग समितीवर दिनेश यादव, संतोष भाऊसाहेब मोरे, पांडुरंग गुलाब भालेकर , ’ग’ प्रभाग संदीप गाडे, विनोद तापकीर, गोपाळ मळेकर, ’ह’ प्रभाग समिती अनिकेत काटे, कुणाल लांडगे, संजय कणसे,

केवळ दोन वर्षांचा कालावधी
मिनी महापालिका असा दर्जा मिळालेल्या प्रभाग समित्यांना महापालिका राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान आहे. या प्रभाग समित्यांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होत असल्याने तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्‍नांना याठिकाणी न्याय देणे शक्य असल्याने राजकीयदृष्ट्याही त्यांचे महत्त्व वाढले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी 2017 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. 15 वर्षापासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीची सत्ता भाजपने उलथवून टाकली. भाजपची पालिकेत येऊन एक वर्षे पूर्ण झाले आहे. वर्षभरानंतर भाजपने स्वीकृत सदस्य निवडणूक घेतली आहे. अधिक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी भाजपने स्वीकृत सदस्यपदाचा दोन वर्षाचा कालावधी निश्‍चित केला आहे.

निष्ठावान आणि आयाराम वाद उफाळला
निष्ठावंतांचे पिंपरी चौकात उपोषण

शहर भाजपमधील निष्ठावान आणि आयाराम यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. प्रभाग समितीवर निवडीत डावलल्याचा आरोप करत होणार्‍या अन्यायाविरोधात जुन्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चौकात उपोषण केले. आंदोलन स्थळी लावलेल्या फलकावर ’’जुने कार्यकर्ते सर्वच निराधार, शहरातील पार्टीला नाही कुणाचाच आधार’’ असा मजकूर लिहिला होता.

निवडणुकीसाठी 121 उमेदवार रिंगणात होते. यापैकी 24 जणांची वर्णी लागणार होती. कोणाला संधी द्यायची यावरुन सत्ताधारी भाजपमध्ये बुधवारी रात्री उशिरापर्यंत धुसफूस सुरु होती. महापालिका निवडणुकीवेळी उमेदवारी नाकारलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी प्रभाग समित्यांवर संधी देण्याची मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली. परंतु, त्यांना डावलण्यात आले आहे. नेत्यांनी स्वीकृत सदस्यपदी जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यासाठी भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात उपोषणाला बसले आहेत. जुन्या कार्यकर्त्यांवर होणार्‍या अन्यायायाविरुद्ध न्याय मिळण्यासाठी हे उपोषण केले.

अन्याय झालेल्यांना संधी दिली
आमदार महेश लांडगे यांनी

भोसरी मतदार संघातील तिन्ही प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. एका प्रभाग समितीवर तीन याप्रमाणे सत्ताधारी भाजपच्या नऊ कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे. निवडी बिनविरोध करुन आमदार महेश लांडगे यांनी मतदार संघावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ज्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही. त्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. संधी देताना समाविष्ट गाव, जुने आणि नवीन कार्यर्त्यांचा समतोल साधला असल्याचे, आमदार लांडगे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची माघार
‘क’ प्रभाग समितीवर सागर हिंगणे, वैशाली खाडे, गोपीकृष्ण धावडे या तिघांना संधी देण्यात आली आहे. ‘इ’ प्रभाग समितीवर अजित बुर्डे, साधना तापकीर, विजय लांडे आणि ‘फ’ प्रभाग समितीवर दिनेश यादव, संतोष भाऊसाहेब मोरे, पांडुरंग गुलाब भालेकर या तिघांची प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘इ’ आणि ‘क’ प्रभागातील निवडणुकीकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाठ फिरविली. तर, ‘फ’ प्रभाग समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्ता साने अनुपस्थित राहिले. उर्वरित नगरसेवकांनी तिन्ही उमेदवारांना समर्थन दिले.

भाजपचे काम समर्थपणे करणार्‍या कार्यकर्त्यांना प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. प्रभाग समितीतीवर सदस्य निवडताना निष्ठावान, नवीन आणि सामाविष्ट गावाचा समतोल साधला आहे. स्वर्गिय अंकुशरराव लांडगे यांच्यासोबत काम केलेले निष्ठावान कार्यकर्ते गोपीकृष्ण धावडे, वैशाली खाडे यांना संधी देण्यात आली आहे. तर, समाविष्ट गावातील अजित बुर्डे, साधना तापकीर यांना देखील स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. प्रभाग समितीवर काम करण्याची संधी मिळालेल्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्‍न सोडवावेत. नागरिकांच्या अडचणी, समस्यांना प्रभाग समितीच्या बैठकीत वाचा फोडावी. त्यांना न्याय मिळवून द्यावा.
-आमदार महेश लांडगे