स्वच्छता होते नावालाच ; स्वच्छता कामगारांच्या मनमानीने संताप
भुसावळ- शहरातील प्रभाग सातमध्ये स्वच्छता नावालाच होत असल्याने नागरीक संतप्त झाले असून आरोग्यदेखील धोक्यात आले आहे. स्वच्छता कामगारांनी चालवलेल्या मनमानीला आळा घालणार कोण? असा प्रश्न उपस्थित हेात आहे. गटारींची स्वच्छता तर सोडा रस्त्यांवर झाडू मारला जावून कचरादेखील उचलला जात नसल्याच्या तक्रारी नागरीकांसह नगरसेवकांनी पालिकेकडे केल्यानंतरही दखली घेतली जात नसल्याची स्थिती आहे. स्वच्छतेच्या अभावाने या भागात साथीच्या रोगांची लागण वाढण्याची भीती असून नगरसेवक मुकेश पाटील यांना पदरमोड करण्याची वेळ आली आहे.
प्रभाग सातमध्ये स्वच्छतेचा उडाला बोजवारा
शहरातील प्रभाग सातमध्ये गेल्या दोन ते चार महिन्यांपासून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. काही स्वच्छता कर्मचारी कामे टाळून ओपन स्पेसमध्ये आराम फर्मावत असल्याची ओरड आहे. नागरीकांनी याबाबत तक्रार केल्यास दादागिरी करन अडवणूक केली जाते. या संदर्भात पालिकेचे मुकादम, आरोग्य निरीक्षक व खुद्द मुख्याधिकारी देखील तक्रारींची दखल घेत नसल्याचा आरोप आहे. प्रभागातील गावठाण, भिलवाडी, गणेश कॉलनी, भिरुड कॉलनी, लोणारी मंगल कार्यालय परीसर, हुडको कॉलनी भाग, म्हाडा परीसर, अष्टविनायक कॉलनी, रेल दुनिया परीसरात स्वच्छता होत नाही तर पु.ना. पाटील नगर, वृंदावन कॉलनी, सुष्टी ट्रेडर्सचा भाग, रींगरोड लगतचा परीसर, मुक्ताई कॉलनी, ताडीचा मळा, मरीमाता मंदिराच्या मागील खळवाडीचा भाग आदी ठिकाणी तर स्वच्छता कर्मचारीच नाही. पालिकेच्या नियमांनुसार कर्मचारी नियुक्त नसलेल्या ठिकाणी सर्व कर्मचार्यांनी एकत्रीत येवून स्वच्छता करणे अपेक्षीत आहे मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही. यामुळे या भागातील नगरसेवक मुकेश पाटील यांना नवीन व जूनी हूडको व अन्य भागात तब्बल नऊ हजार रुपये पदरमोड करुन गटारींची स्वच्छता केल्याचे ‘जनशक्ती’शी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे पाटील हे सत्ताधारी नगरसेवक असतानाही हा प्रश्न सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी
प्रभाग सातमधील स्वच्छतेच्या प्रश्नी तक्रारी केल्यानंतर मुकादम व आरोग्य अधिकारी स्वच्छता झाल्याचे अभिप्राय मुख्याधिकार्यांना देतात मात्र प्रत्यक्षात ही कामे होतच नाहीत. मुख्याधिकारी सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात ही स्थिती असताना विरोधकांच्या वॉर्डात तर न बोललेलेच बरे, असे एकूण चित्र आहे.