प्रभाग 3 मधील वास्तवता: मुलभूत सुविधांपासून रहिवासी वंचित

0

उपमहापौरांसह पदाधिकार्‍यांनी प्रभाग 2 मध्ये केली पाहणी

जळगाव: शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. प्रभागात असलेल्या ज्ञानदेवनगरात तर पक्के रस्ते नाहीत,गटारी नाहीत,पथदिवे नाहीत,साफसफाई होत नाही,ठिकठिकाणी असलेल्या खुल्या जांगावर मोठमोठी झाडेझुडपे वाढलेली आहेत. काही ठिकाणी तर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. नागरिकांना लोकसहभागातून रस्त्यांची कामे केली आहेत.पक्के रस्ते तर सोडाच पण मुरुमाचेही रस्ते नाहीत. जळगाव हे शहर असूनही खेडे गाव आहे की,काय? अशी प्रचिती यायला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान,पथदिवे,रस्ते आणि गटारी करुन द्याव्यात अशी मागणी देखील नागरिकांनी केली.

पथदिव्यांअभावी परिसरात अंधार
परिसरातील काही भागात पथदिवे आहेत मात्र कधी सुरु असतात तर कधी बंद असतात. परंतु काही भागात पथदिवेच नाहीत.त्यामुळे परिसरात अंधार असतो.त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वीजेचे खांब उभारुन लाईट लावावेत अशी अपेक्षा आहे. अनेक समस्या आहेत मात्र मनपा प्रशासन अकार्यक्षम असल्यामुळे उपाययोजना होत नाही. मनपात भाजपची सत्ता आहे. प्रभागातील नगरसेवकही सत्ताधारी भाजपचे आहेत. त्यामुळे किमान मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची अपेक्षा आहे.

शहरापेक्षा खेडेगाव बरे
खेड्यापाड्यातील नागरिक मुलांच्या शिक्षणासाठी,नोकरीसाठी शहरात येतात. कारण शहरात सर्व सुविधा असतात अशी धारणा आहे. ज्ञानदेवनगरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास असूनही रस्ते नाहीत.गटारी नाहीत,काही ठिकाणी गटारी आहेत तर त्या नावालाच आहेत.पथदिवे नाहीत,साफसफाई होत नाही,शहरीकरणाच्या अशा कुठल्याच सुविधा नाहीत.त्यामुळे शहरापेक्षा खेडेगाव बरे आहे अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.दरम्यान,मनपा प्रशासनासह पदाधिकारी आणि शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी प्रभागात येवून पाहणी करावी,आणि किमान मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.भाजपच्या नेत्यांनी विकसाबाबत मोठमोठे आश्‍वासन दिले मात्र त्यांचे आश्‍वासन हवेतच विरले की काय अशी आता प्रचिती यायला लागली आहे.

उपमहापौर सुनील खडके यांच्यासमोर प्रभाग 2 मधील नागरिकांनी वाचला तक्ररींचा पाढा
प्रभाग क्रमांक 2 मधील विविध वसती, भाग यांना उपमहापौर सुनील खडके यांनी भेट दिली. यावेळी नागरीकांनी त्यांच्यासमोर आपापल्या तक्रारींचा पाढा वाचला. अनेक नव्या जून्या वसतींमध्ये पक्क्या गटारी झालेल्याच नाहीत. कच्च्या चारींमधून सांडपाणी वाहून नेत कोठेतरी इतरत्र सोडून दिले जाते. सर्वच ठिकाणी रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत, अमृत योजनेमुळे अनेक भागांत प्रथमच जलवाहिणी पोहोचली असून, त्यातुन प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरु होण्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. अतिक्रमण, स्ट्रीट लाईट, आंगणवाडी बालवाडीची आवश्यकता यांबाबतही जनतेने यावेळी उपमहापौरांचे लक्ष वेधले.

अनेक समस्यांबाबत त्वरित जागीच कार्यवाही करण्याच्या सुचना उपमहापैारांनी यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना केल्या. तातडीची कामे त्वरीत मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहणारअसल्याचे उपमहापौर खडके यांनी सांगितले आहे. अमृत, ड्रेनेज इत्यादी योजनेच्या कामांमुळे खराब झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रेल्वे लाइनला लागुन असलेल्या वस्तीतील सांडपाणी वाहुन नेणार्‍या गटारीचे पाणी ममुराबाद रोड भागात तुंबत आहे. रेल्वेने अलिकडेस संरक्षण भिंत बांधल्याने ते रेल्वे हद्दीतुन वाहुन जात नाही. याबाबत आवश्यक ते उपाय त्वरीत योजण्याची मागणी या भागातील रहीवाश्यांनी केली. रहदारीच्या रस्त्यावर पक्क्यास्वरुपाचे अतिक्रमण करण्यात आलेली असल्याची तक्रार इंदिराबाई पाटणकर शाळे जवळील रहीवाशांनी केली.

उस्मानिया पार्क या वस्तीला 7 ते 8 वर्षे होऊनही तेथे पिण्याचे पाणी पोहोचलेले नाही, इतरही समस्या आहेत. गटारीतील गाळ नियमित उपसला जात नाही. उस्मानिया पार्क परिसरातच आंगणवाडी बालवाडीची आवश्यकता असल्याचे काही नागरीकांनी निदर्शनास आणुन दिले. अमर कॉलनी इत्यादी भागातील नागरीकांनी मालमत्ता कर इत्यादी कराच्या रक्कमा वेळच्यावेळी भरुनही सुविधा मिळत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. या भागात नविन महत्वाकांक्षी अमृत पाणी पुरवठा योजना पोहाचली आहे. त्याच बरोबर नविन योजनेच्या भुमिगत गटारींचे कामही झाले आहे. त्याचा वापर त्वरित सुरु करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. नागरीकांनी तक्रार केली की, काही ठिकाणी खाजगी प्लॉटवर लोक कचरा आणुन टाकतात पण तो उचलला जात नाही. याबाबत त्वरीत कचरा उचलण्याच्या सुचना उपमहापौरांनी दिल्या. अंबिका सॉ मिल ते भुरे मामलेदार प्लॉट येथे रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाजी नगर स्मशानभुमितील गैरसोय नागरीकांनी या भेटीत लक्षात आणुन दिल्या ओटे वाढविण्यासह, स्मशानभुमिला कंपाऊंड करणे, प्रवेशव्दाराची उंची वाढविणे, लाइट बसविणे इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

याप्रसंगी महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, विधी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, स्वच्छता समिती सभापती चेतन सनकत, नगरसेविका गायत्री राणे, दीपमाला काळे, मिनाक्षी पाटील यांच्यासह स्थानिक नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, गायत्री शिंदे , शहर अभियंता अरविंद भोसले, पाणी पुरवठा अभियंता सुशिल साळुंखे, प्रभाग अधिकारी, व्ही.ओ.सोनवणी, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, नगररचना सहाय्यक प्रसाद पुराणिक, शाखा अभियंता संजय पाटील, सुनिल तायडे, किरण मोरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एस.टी. अत्तरदे, स्वच्छता निरीक्षक शंकर डाबोरे, सुक्ष्म जीवशास्त्र विभागाचे सुधीर सोनवाल आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.