माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी केले आयुक्तांना ‘चॅलेंज’
जळगाव- शहरातील फुले व्यापारी बाजारपेठेतील अतिक्रमणाबाबत प्रशासनाची भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित करत आपण आस्थापनेवर एवढा खर्च करतो. अतिक्रमण हटविण्यास लाखो रुपये खर्च करुन पोलीस बंदोबस्त मागवतो. मात्र 15 व्या मिनिटाला अतिक्रमण जैसे थे होते. प्रभाग क्र.5 मधून जर आयुक्तांची चारचाकी गेली तर आपल्या पदाचा राजीनामाच देईन, असे आवाहन करत जळगाव शहरात फुले मार्केट, शिवाजी रोड येथे अतिक्रमण जैसे थे झाले आहे. त्यामुळे जळगाव शहर हे अतिक्रमण युक्त शहर झाले असून अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण संवर्धन व संरक्षण विभाग असे नामकरण करा, अशी टीका शिवसेनेचे नगरसेवक माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी स्थायी समिती सभेत केली. पुढे बोलतांना नितीन लढ्ढा यांनी फेरीवाल्यांसाठी ख्वाजामिया परिसर व सानेगुरुजी रुग्णालयाची मनपाची जागा उपलब्ध आहे. मात्र तिथे न बसता विक्रेते आहे त्याच ठिकाणी ठाण मांडून आहेत. रस्ते हे केवळ रहदारीसाठीच हवे, असे मत व्यक्त केले.
समांतर रस्त्यांना पोल शिफ्टींगचा अडसर
समांतर रस्त्यांचे काम दोन फेसमध्ये करण्यात येणार आहे. 141 कोटीचा हा प्रकल्प आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती नसल्याने पोल शिफ्टींगचे काम मनपा करु शकणार नाही. एमएसइबीनेही आर्थिक बाजू उपस्थित करत शिफ्टींगला नकार दिला आहे. तर खासदार उन्मेष पाटील यांनी बैठकीत डीपीडीसीकडून मिळणार असल्याचे सांगितले होते मात्र डीपीडीसीनेही नकार दिल्यानंतर पोल शिफ्टींग नसल्यास प्रकल्प 69 कोटीचाच राहणार असल्याची माहिती लढ्ढा यांनी दिली. लिफ्टच्या विषयावर बोलताना नितीन लढ्ढा यांनी निविदा स्वीकारणार्या दोन कंपन्या या अनोळखी आहेत. 20 वर्षपूर्वी ज्यांनी लिफ्टचे काम केले त्या चांगल्या सर्व्हिस देणार्या दर्जेदार कंपन्या होत्या, अशी माहिती दिली.