प्रभारी आयुक्तांनी शहरात केली स्वच्छतेची पहाणी

0

जळगाव । प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज बुधवारी सकाळी शहारातील काही भागात स्वच्छतेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी केलेल्या सूचनांनुसार आरोग्य विभागाकडून रस्त्यावर कचरा टाकणार्‍या काही व्यावसाविकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त जीवन सोनवणे हे जुन महिन्यात सेवानिवृत्त झाल्यानतंर त्यांचा प्रभारी पदभार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला. तेव्हापासून निंबाळकर यांनी शहरातील नागरी परिसर व मार्केटमधील स्वच्छतेच्या कामांकडे लक्ष दिले. गोलाणी मार्केटमध्ये निंबाळकर यांच्या दणक्याने स्वच्छतेच्या दैनदिन कामांना सुरळीत सुरुवात झाली. त्यापाठोपाठ त्यांनी फुले मार्केटमधील व्यापार्‍यांना देखील स्वच्छता करा अथवा मार्केट बंद करण्याचा इशारा दिला होता. यामुळे फुले मार्केटमधील हॉकर्स व्यापार्‍यांनी स्वच्छता केली.

यानतंर काही दिवसाच्या विश्रांतीनतंर आज बुधवारी पुन्हा जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी शहरातील विविध भागात जावून स्वच्छतेची पाहणी केली. महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील, आरोग्य अधिक्षक ए.एन. नेमाडे सोबत होते. सर्वप्रथम भूषण कॉलनी, शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, मारुती पार्क, शिव कॉलनी स्टॉप, गुजराल पेट्रोल पंप, खोटे नगर, आनंद नगर, दादावाडी, पिंप्राळा व भोईट नगर भागात स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. निंबाळकर यांनी दिलेल्या सूचनानतंर शिव कॉलनी स्टॉपवर टपरीच्या बाहेर कचरा असल्याने दोन टपरीधारकांना प्रत्येकी 200 रुपये दंड करण्यात आला.