प्रभारी आयुक्त निंबाळकरांची बंदिस्त नाट्यगृहासह क्रीडा संकुलास भेट

0

जळगाव। शहरातील विविध भागांमध्ये जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निबांळकर यांनी भेट देऊन पहाणी केली. यात त्यांनी बंदिस्त नाट्यगृह, क्रीडा संकुल यांचा समावेश होता. महाबळ रस्त्यांवरील नाट्यगृहाची पहाणी करतांना श्री. निबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली. शहरात मध्यवर्ती वातानुकूलीत यंत्रणा, अंतर्गत सजावट, खुर्च्या आदींची सुविधा असलेले बंदिस्त नाट्य उभारण्याची सुरूवात तीन वर्षांपासून झाली आहे. मात्र जळगावकरांची या नाट्यगृहाची प्रतीक्षा संपत नाही. हे नाट्यगृह एका वर्षात तयार करणे गरजेचे होेते.

आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी
जिल्हा नियोजन समितीने यासाठी निधी मंजूर केला होता. हे नाट्यगृह महाबळ रस्त्यावर उभारण्यात येत आहे. तीन वर्षांपासून काम रखडल्याने प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने काम व्यवस्थित न केल्याने श्री. निंबाळकर यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. इलेक्ट्रीकल व स्थापत्य मक्तेदारायांचे अक्षम दुर्लक्ष झाले असल्याचे यावेळी श्री. निंबाळकर यांना आढळून आले. यावेळी श्री. निंबाळकर यांनी अधिकार्‍यांना नाट्यगृहाचे काम वेगात करण्याचे सूचना देवून लागलीच शुक्रवारी बैठक बोलविली आहे.

अधिकार्‍यांसोबत आज घेणार बैठक
नाट्यगृह उभारणी एका वर्षांत करणे आवश्यक असतांना काम रखडल्याने याबाबत जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त निबांळकर यांनी नाराजी व्यक्त केली. नाट्यगृहाचे कामास वेग देण्याच्या उद्देशाने उद्या 14 जुलै रोजी श्री. निबाळकर यांनी बैठक बोलविली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलास भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी संकुलातील स्वच्छतेची पाहणी केली असता त्यांना क्रीडा संकुलाची स्वच्छता समाधानकारक दिसून आली. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सुरू करण्याचा मानस यावेळी श्री. निंबाळकर यांनी व्यक्त केला. तसेच क्रीडा संकुलासमोर कॅफेट एरिया उभारण्याची विचाराधीन असल्याचे श्री. निंबाळकर यांनी सांगितले.