प्रभारी पोलिस अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस

0

जळगाव । पोलीस ठाण्यात ड्यूटी लावली असताना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शहरातील तीन पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचार्‍यांसह एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदारास पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी तडकाफडकी निलंबन केले. ड्यूटी असताना कर्मचारी गैरहजर राहतात,याबाबत त्या त्या ठाण्यातील प्रभारी अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस पोलीस अधीक्षकांनी काढली असून खुलासा न सादर केल्यास या अधिकार्‍यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

पोलिस अधिक्षकांकडे अहवाल सादर
पोलीस ठाण्यात त्या त्या कर्मचार्‍यांना ड्यूटी लावली जाते. तसेच रात्रीची गस्त साठीही ड्यूटीचे नियोजन करून दिले जाते. प्रशिक्षणार्थी आयपीएस मनीष कलवानिया तसेच प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक संतोष गाकवाड हे नाईट राऊंडलाअसताना त्यांनी विविध पोलीस ठाण्यास भेट दिली; त्यावेळी कर्मचारी गैरहजर असल्याचे समोर आले होते. यासंदर्भात जबाब घेऊन त्यांनी अहवाल पोलीस अधीक्षक डॉ. सुपेकर यांच्याकडे अहवाल सादर केला होता. या अहवालावरून कर्मचार्‍यांसह अधिकार्‍याचे निलंबन करण्यात आले.

चौघांवर केली होती निलंबनाची कारवाई
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्सटेबल सुनील तेली यांची ठाण्यातील लॉकअप सुरक्षेची ड्यूटी लावण्यात आली होती. परंतु प्रशिक्षणार्थी अधिकार्‍यांना तो गैरहजर असल्याचे दिसून आले होते. शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल उमेश साळुंखे यांना नाकाबंदीसाठी ड्यूटी होती. मात्र ते ड्यूटीवर गैरहजर असल्याचे दिसले. तर जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोहेकॉ पुरूषोत्तम वागळे यांची रिझर्व्ह ड्यूटी होती. परंतु तेदेखील ड्यूटीवर हजर असल्याचे दिसून आले नव्हते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार प्रकाश महाजन यांना रात्रीची पेट्रोलींगची ड्यूटी देण्यात आली होती. मात्र ते ड्यूटीवर हजर असल्याचे आढळून आले नाही. या प्रकरणी प्रशिक्षणार्थी अधिकार्‍यांनी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर केला. या अहवालाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी चौघांना निलंबित करण्याचे आदेश बजावले. जिल्हापेठ, एमआयडीसी व शहर पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकार्‍यांना याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून खुलासा मागविला आहे. समाधानकारक खुलासा न केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

वाघ यांची नव्याने चौकशी
अमळनेर येथील नगरसेवक श्यामकांत उर्फ घनश्याम जयवंतराव पाटील याच्यावर जिल्हाधिकार्‍यांनी एमपीडीएची कारवाई करून स्थानबद्धतेचे आदेश दिले होते. मात्र, ते आदेश न बजावल्याने पाटील पसार झाला. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी विकास वाघ यांची चौकशी करून त्यांची नियंत्रणकक्षात बदली करण्यात आली होती. आता पुन्हा विकास वाघ यांची नव्याने चौकशी केली जात असून त्यात चौकशी अहवाल आल्यावर त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई होणार आहे. वेळप्रसंगी निलंबनालाही त्यांना सामोरे जावे लागेल.