प्रमोदनगरातील वाईन शॉपने ‘स्थायी’त गदारोळ

0

धुळे । शहरातील कायम रहदारी व शाळा,महाविद्यालयाचा रस्ता असलेल्या प्रमोद नगर भागात मनपाची नाहरकत परवाना नसतांना वाईन शॉप दुकानाचे काम सुरू असल्याचा मुद्दा स्थायी समीतीत नगरसेवकांनी उपस्थित केल्यावर सभेत एकच खळबळ उडाली. तर आयुक्ताच्या घरावरील दगडफेकीची सी आय डी चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान उपायुक्तांनी याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल असे सांगीतले. महापालिकेच्या सभागृहात शुक्रवार 9 रोजी सकाळी 11 वाजता सभापती कैलास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी उपायुक्त रवींद्र जाधव, प्र.सचिव सरोदे, स्थायी समिती सदस्य कमलेश देवरे, सय्यद साबीरअली मोतेब्बर,संजय गुजराथी, चित्रा दुसाणे, ललीता आघाव, जेबून्निसा अशरफ पठाण, नानाभाऊ मोरे, यमुनाबाई जाधव, गुलाब माळी, वालीबेन मंडोरे, शेख हजराबी महम्मद आदी उपस्थित होते.

एनओसी दिली नसल्याचा निर्वाळा
आयत्यावेळी आलेल्या विषयावर बोलतांना कमलेश देवरे यांनी वाईन शॉपचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, प्रमोद नगर सेक्टर 2 मध्ये भरवस्तीत वाईनशॉप सुरु करण्याचे काम प्रस्तावीत असून याबाबत महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेतले आहे का? घेतले असेल तर ते कोणत्या अधिकार्‍याने दिले आहे? याची चौकशी करण्यात यावी. वाईनशॉप सुरु करण्यासाठी परवानगी देतांना प्रशासान किंवा संबंधित विभागाने रहिवासी भागात या वाईन शॉपला परवानगी दिलीच कशी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. रहिवास असलेल्या जागेचा वाणिज्य वापरासाठी उपयोग करता येत नसतांना हे वाईन शॉप सुरु करण्याचा प्रयत्न करणार्‍या संबंधित मालकाविरुध्द मनपा प्रशासनाने कारवाई करावी. यावर मनपा प्रशासनाने खुलासा करतांना सांगितले की, याबाबत मनपा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे ’एनओसी’ घेतलेली नाही. या संदर्भात सदर दुकानाबाबत चौकशी करण्यात येईल. पुढील सभेत याबाबत खुलासा सादर करण्यात येईल.

दगडफेकीची सीआयडी चौकशी करा
आयुक्तांच्या घरावर झालेल्या दगडफेकीची चौकशी करा तत्कालीन मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्या घरावर झालेल्या दगडफेकीची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी गेल्या वेळच्या सभेतही केली होती. या घटनेबाबत अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही. योग्य चौकशी झाली असती तर यातून दगडफेक करणार्‍यांचे खरे चेहरे समाजासमोर येतील, असे नगरसेवक साबीर सय्यद यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, दगडफेक खरोखरच झाली आहे का? या दगडफेकीच्या मागे कुठले राजकीय षडयंत्र तर नव्हते ना? म्हणून याबाबत सीआयडी चौकशी व्हावी. यामुळे खरा प्रकार उघड होईल. नगरसेवक सय्यद यांनी दुसरा मुद्दा उपस्थित करतांना म्हटले की, कचरा संकलनाचा ठेका तत्कालीन आयुक्त दौलत खाँ पठाण यांनी फक्त 15 दिवसांसाठी दिला होता. परंतू, आज अडीच वर्ष झाले तरी हाच ठेकेदार हा ठेका चालवित आहे. ठेकेदार का बदलण्यात आला नाही. यामागे भ्रष्टाचार झाल्याचा संशय येतो. म्हणून याबाबत चौकशी करून पुढील सभेत खुलासा करावा. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी विद्युतीकरणाचा ठेका देण्यासाठी निवीदा मंजूरीचा विषय अजेंड्यावर आला असता याबाबत संजय गुजराथी यांनी विद्युतीकरणाचे काम करतांना ’आयएसआय’ मार्क असलेलेच उपकरणे वापरावीत.याबाबत महापलिकेने दक्षता घ्यावी. व हे काम तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक संजय गुजराथी यांनी केली.

महिलांचा वॉईनशॉपवर हल्लाबोल
महापालिकेत प्रिन्स विरोधात कारवाईची मागणी होत असतांना प्रमोद नगर सेक्टर 2 मधील महिला वॉईन शॉप हटविण्यासाठी आक्रमक झाल्या. या भागातील नगरसेविका वैभवी दुसाणे आणि कमलेश देवरे यांना सोबत घेत महिलांनी प्रिन्स वाईन शॉपवर हल्ला बोल केला. दुकानासमोर आंदोलन करणार्‍या महिला अधिकच आक्रमक झाल्या. त्याच्या संयमाचा बांध सुटल्याने त्यांनी वॉईन शॉपची तोडफोड सुरु केली. दरवाजाला लाथा मारल्या काहींनी दगड फेकही केल्याचे समजते. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता आम्हाला अंधारात ठेवून ही घाण आमच्या अंगणात आणलीच कशी असा संतप्त सवाल महिला विचारीत आहेत.