पाच वर्षात आकाशवाणीवर 250 कार्यक्रम
नाशिक : नाक, कान व घसा तज्ज्ञ डॉ. प्रमोद महाजन यांनी आकाशवाणीवर तंबाखू, गुटखा, धुम्रपान, मद्यपान व्यसन समस्येवर मात करण्याबाबत गेल्या पाच वर्षांत 250 कार्यक्रम घडवून आणले आहेत. आकाशवाणीचे राज्यस्तरावरील सहायक निर्देशक भूपेंद्र मिस्त्री यांनी डॉ. महाजन यांच्या कार्याची प्रशंसा केली. डॉ. प्रमोद महाजन यांनी व्यसनमुक्तीसाठी केलेल्या मार्गदर्शनातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या, वैचारिकदृष्ट्या भरकटलेल्या व्यसनाधिनांनी प्रेरणा घेऊन व्यसनमुक्त राहण्याचा निश्चय केला.
गरजूंसाठी सीडी मोफत उपलब्ध
व्यसनमुक्त झालेल्यांचे अनुभव कथन ऐकून व्यसनमुक्तीचा विचार करणार्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना नवी उमेदच मिळाली. दर शनिवारी 9.10 मिनिटांनी सदर कार्यक्रम झाले मोकळे आकाश या सदराखाली चालविला गेला. या प्रत्येक कार्यक्रमाचा फायदा लाखो व्यक्तींपर्यंत पोहोचला. या कार्यक्रमात व्यसनाची समस्या, व्यसनमुक्तीचे उपाय व उपचार, व्यसनी नातेवाईक, मित्रांचे समुपदेशन, 50 पेक्षा अधिक व्यसनींचे स्वत:च्या समस्यांबाबत स्वअनुभव कथन अशा विषयांवर प्रबोधन केले आहे. या संबंधातील रिकॉर्डेड मार्गदर्शक कार्यक्रमाची व्यसनमुक्तीची सीडी गरजूंसाठी मोफत उपलब्ध आहे. डॉ. प्रमोद महाजन यांनी करू या मद्य व्यसनमुक्ती व तंबाखू गुटखा, मद्यपान यावर मात अशी प्रत्यक्ष स्वकार्यातून स्फुरलेली पुस्तकेही उपलब्ध आहेत. डॉ. प्रमोद महाजन यांचे रिदम संस्थेमार्फत अध्यक्ष डॉ. जयंत ढाके, मानसिक रोग तज्ज्ञ यांनी व सातपुडा विकास संस्थेमार्फत अध्यक्ष सुनील पाटील यांनी कौतुक केले.