जळगाव : अस्थिर बाजारभाव, प्रतिकूल हवामान आदी कारणांनी शेती परवडत नसतानाही आशावाद न सोडता सातत्याने नवीन प्रयोग करणारे शेतकरी खरे दीपस्तंभ आहेत. सर्व शेतकरी एकजुटीने राहिल्यास शेतीचे प्रश्न सोडविणे अवघड नाही. शासनानेही नियंत्रित शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पॉलिहाऊसला 75 टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध करुन द्यावे, असे प्रतिपादन माजी आमदार चिमणराव पाटील यांनी येथे केले. शहरातील शिवतीर्थ मैदानावर अॅग्रोवर्ल्डतर्फे आयोजित राज्यस्तरीय कृषी व पशू प्रदर्शनात शनिवारी (ता.4) प्रयोगशील शेतकरी, कृषी उद्योजक, अधिकारी व शास्त्रज्ञांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी माजी आमदार चिमणराव पाटील बोलत होते.
जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी व्यासपीठावर अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के. डी. महाजन, जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बर्हाटे, प्लॅन्टो कृषीतंत्रचे संचालक स्वप्निल चौधरी, श्रीराम ठिबकचे कार्यकारी संचालक श्रीराम पाटील आदी उपस्थित होते. प्रदर्शनातील चर्चासत्रात रविवारी 5 रोजी दुग्धव्यवसाय व्यवस्थापन, हायड्रोपोनिक चारा, अॅझोला व मूरघास निर्मिती, या विषयावर पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत येवले सकाळी अकराला, शेळीपालन व्यवस्थापन विषयावर डॉ. नीलेश बारी मार्गदर्शन करणार आहेत.