ग्रामसेवक युनयिन धुळे जिल्हा संघटनेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
धुळे| गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पाणी व स्वच्छता विभागामार्फत ग्रामसेवकांना मोठ्या प्रमाणात कारवाईची भिती दाखवून दहशतीत ठेवत आहेत. दररोज मोबाईलवर संदेश करुन सर्व कामाचा व्हॉट्सअपवर ते आढावा घेत आहेत. यासह विविध माध्यमातून ते ग्रामसेवकांवर कारवाई करुन त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा दहशतीचा व त्रास देण्याचा प्रकार थांबवून आमच्या विविध मागण्या मान्य कराव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनयिन धुळे जिल्हा संघटनेचा मोर्चा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ’नही चलेंगी..नही चलेंगी, गंगाथरण की दडपशाही नही चलेंगी’, अशा घोषणा मोर्चेेकर्यांनी यावेळी दिल्यात. या मोर्चात सर्वच ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी संघटनेच्यावतीने असहकार अहवाल बंद आंदोलनही पुकारण्यात आले आहे.
कारवाईची भीती दाखवून दहशत
गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पाणी व स्वच्छता विभागामार्फत ग्रामसेवकांना मोठ्या प्रमाणात कारवाईची भीती दाखवून दहशतीत ठेवत आहेत. व्हॉट्सअपद्वारे ते भारत स्वच्छता मिशनचा आढावा घेत आहेत. जसे काही ग्रामपंचायतीचा सचिव या नात्याने ग्रामसेवकांना एकच काम शिल्लक आहे आणि ते म्हणजे ग्रामीण भागातील कुटुंबांना ग्रामसेवकांनी स्वतः वैयक्तीक निधीची तरतूद करुन शौचालयाचे बांधकाम करुन द्यावे. सध्या हा एक कलमी कार्यक्रम अधिकार्यांनी सुरु केला आहे. या कामांना ग्रामसेवकांचा विरोध नाही. परंतू, या कामाच्या पध्दतीमुळे ग्रामसेवक भयभीत झाला आहे
कामे कशी करायची
कारण, नियमानुसार काम करुन देखील ग्रामसेवकांवर कारवाई होत आहे. यामुळे कामच करु नये. या निर्णयापर्यंत ग्रामसेवक येऊन पोहोचले आहेत. वरिष्ठ अधिकार्यांनी बोलविलेल्या मिटींगमध्येही कामाचा आढावा कमी आणि कारवाई करण्याचा इशाराच अधिक देण्यात आला. यामुळे सीईओ आणि उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या कामाच्या पध्दतीविषयी ग्रामसेवकांमध्ये संतप्त भावना आहेत. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून संघटनेतर्फे असहकार, अहवाल बंद आंदोलन व मोर्चा काढण्यात आला आहे.
ग्रामसेवकांच्या अशा आहेत मागण्या
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम ग्रामसेवक करणार नाहीत. यात प्रामुख्याने ग्रामसेवक शिल्लककुटुंबांना गृह भेट देवून मन परिवर्तन करतील व त्या कामाचे अहवाल तयार करुन पंचायत समितीला सादर करतील. आंदोलन संपल्यानंतर यावर कार्यवाही होईल.,यापुढे येणार्या सर्व पं.स. व जि.प. स्तरावरील बैठकींवर बहिष्कार टाकतील. व ग्रामसेवक आपापल्या ग्रामपंचायतींत कामकाज सांभाळतील., या पुढे कोणत्याही कामकाजाचे अहवाल सादर केले जाणार नाही., ग्रामपंचायतीचे लेखे तपासणीस उपलब्ध केले जाणार नाही, अॅनड्रॉईड मोबाईल हे ग्रामसेवकांची खासगी मालमत्ता असल्याने त्यावरील व्हॉट्सअप ग्रुपमधून ग्रामसेवक बाहेर पडतील., कोणतीही सभा अथवा सुचना व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्विकारली जाणार नाही व अंमलबजावणी केली जाणार नाही. शिरपूर तालुक्यातील बलकुवा ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या स्वच्छ भारत मिशन प्रकरणात उर्वरीत दोषींवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात यावी, ग्रामपंचायत तपासणीसाठी ग्रामपंचायत अधिनियमातील तरतूदीचा वापर करण्यात यावा., स्वच्छ भारत मिशनचे काम हे भयमुक्त वातावरणात यापुढेही ग्रामसेवक करण्यास तयार आहेत., धुळे गटातील जुनवणे ग्रा.पं.अंतर्गत प्रकरणात दोषींवर फौजदारी कार्यवाही करावी, निलंबित ग्रामसेवकांना कामावर घ्यावे, बंद केलेली वेतनवाढ सुरु करावी., एकस्तर वेतनश्रेणी फरक मिळावा, साक्री येथील संपकाळातील 17 दिवसांचा पगार मिळावा, असहकार आंदोलन काळातील वेतन कपातीचे पत्र मागे घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघटनेने केली आहे.
मोर्चात यांनी घेतला सहभाग
या मोर्चात व आंदोलनात संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, प्रशांत जामोदे, डॉ.संजय पाटील, प्रभाकर भामरे, प्रवीण मोरे, राहुल देवरे, संजय बोरसे, एन.ए.बिरारीस, जितू गवळी, संजय पावरा, प्रफुल शिंदे, डि.टी.शिंदे, डि.एन.पवार, सुनंदा राठोड, स्मिता तोरवणे, सुनीता अहिरे आदींसह ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.