प्रलंबित वेतन रोखीने मिळणार

0

मुंबई । अंगणवाडी कर्मचार्‍यांना त्यांचे मानधन वेळेत मिळावे यासाठी सध्या ते पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. पण बँक खाती आधार कार्डशी संलग्न न केल्यामुळे काही अंगणवाडी कर्मचार्‍यांचे जून 2017 पासूनचे मानधन रखडले असून ते सध्या जुन्या पद्धतीने म्हणजे रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तथापि, मोहीम राबवून डिसेंबर 2017 पर्यंत उर्वरीत अंगणवाडी कर्मचार्‍यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न करण्यात यावीत. कोणत्याही परिस्थितीत जानेवारी 2018 पासून त्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यात यावे, असे निर्देश महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आयसीडीएस (एकात्मिक बालविकास सेवा योजना) आयुक्तालयास दिले आहेत.

1.85 लाख कर्मचार्‍यांचे मानधन थेट बँक खात्यात
राज्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची संख्या 2 लाख 7 हजार इतकी आहे. पुर्वी या अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मानधन रोखीने दिले जात असे. त्यासाठीचा निधी हा मंत्रालय, आयसीडीएस आयुक्तालय, जिल्हा कार्यालय, तालुका कार्यालय अशा विविध टप्प्यातून अंगणवाडी कर्मचार्‍यापर्यंत पोहोचत असे. या सर्व प्रक्रियेस फार विलंब लागत असे. हा विलंब टाळण्यासाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मानधन पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची पद्धती अवलंबिण्यात आली. या पद्धतीत मधील सर्व टप्पे रद्द होऊन आयसीडीएस आयुक्तालयातून थेट अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात मानधन जमा होऊ लागले. त्यामुळे मानधनासाठी लागणारा विलंब टळला आहे.

उर्वरितचे लवकरच खात्यावर
यासंदर्भात माहिती देताना आयसीडीएस आयुक्त कमलाकर फंड म्हणाले, पीएफएमएस प्रणालीअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 85 हजार अंगणवाडी कर्मचार्‍यांचा समावेश झाला असून सध्या त्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा होत आहे. उर्वरीत साधारण 22 हजार अंगणवाडी कर्मचार्‍यांनी त्यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न न केल्यामुळे त्यांचे जून 2017 पासुनचे मानधन अदा करता आलेले नाही. सध्या या कर्मचार्‍यांना जून ते डिसेंबर 2017 पर्यंतचे मानधन जुन्या पद्धतीने म्हणजे रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी झाला असून त्यांना प्रलंबित मानधन तातडीने रोखीने अदा केले जाणार आहे, असे श्री. फंड यांनी सांगितले.

आधार संलग्नतेसाठी मोहीम राबवा -पंकजा मुंडे
मंत्री पंकजा मुंडे यासंदर्भात म्हणाल्या, अंगणवाडी कर्मचार्‍यांना त्यांचे मानधन वेळेत मिळणे आवश्यक आहे. यासाठीच महिला बालविकास विभागाने पुढाकार घेऊन अत्याधुनिक अशी पीएफएमएस प्रणाली विकसीत केली आहे. या कर्मचार्‍यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न करुन त्यांना पीएफएमएस प्रणालीत आणण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 2017 अखेर या कर्मचार्‍यांना पीएफएमएस प्रणालीअंतर्गत आणून जानेवारी 2018 पासून त्यांचे मानधनही थेट बँक खात्यात जमा करण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी आयसीडीएस आयुक्तालयास दिले आहेत.