प्रवाशांच्या आग्रहास्तव बसचा रंग बदलण्याचा प्रशासनाचा निर्णय

0

पीएमपीच्या लाल-पिवळ्या बस आता होणार निळ्या

पुणे । पीएमपीच्या बस म्हणजे लाल-पिवळा रंग, असे गेल्या 69 वर्षांपासून समीकरण झाले आहे. हे समीकरण आता बदलणार आहे. यापुढे सर्व बस निळ्या रंगात पाहायला मिळणार आहेत. प्रवाशांच्या आग्रहास्तव बसचा रंग बदलण्याचा निर्णय पीएमपी प्रशानसाने घेतला आहे.

2,200 बसचा रंग बदलणार
पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 2 हजार 200 बस आहेत. या सर्व बसचा रंग बदलण्यात येणार आहे. तसेच नव्याने येणार्‍या 200 मिडी बसही निळ्या रंगसंगतीमध्ये असतील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसचा रंग बदलायचा असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. त्या बाबतची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

300 बसचा रंग बदलला
बसच्या रंगसंगतीबाबत पीएमपी प्रशासनाने गेल्या वर्षी नागरिकांकडून सूचना मागविल्या होत्या. त्यात बहुसंख्य नागरिकांनी पीएमपीच्या बसचा सध्याचा रंग बदलून नवा रंग देण्यात यावा, असे सुचविले होते. त्याअंतर्गत काही प्रवाशांनी निळा रंगही सुचविला होता. त्यानुसार बसला बाहेरून निळा रंग देण्याची प्रक्रिया सुमारे 15 दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. सध्या सुमारे 300 बसचा रंग बदलण्यात आला आहे. येत्या महिनाभरात सर्व बस निळ्या रंगात दिसतील, असेही संबंधित अधिकार्‍याने स्पष्ट केले.

सीएनजीवरील 500 नव्या बस
1948 पासून पीएमपी बसचा रंग लाल-पिवळ्या स्वरुपाचा आहे. मध्यंतरी सीएनजीवरील 500 बस नव्या आल्या. त्यात पांढरा-हिरवा रंग होता. परंतु लाल-पिवळ्या रंगाचाही समावेश त्यात होता. या पार्श्वभूमीवर आता सर्व बसला निळा रंग देण्यात येत आहे.