पुणे । गेल्या दहा दिवसांपासून चार पीएमपीएमएल बसना काहींना काही कारणांमुळे आग लागल्याच्या घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे तर टाटा कंपनीच्या तज्ज्ञांनाही या प्रकारची तपासणी करण्यास बोलाविले आहे. त्यात कोणाच्या हलगर्जीपणामुळे संबंधित प्रकार घडत आहे याचे कारण शोधले जाणार आहे आणि ज्यांच्या चुकीमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होतो आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
27 नोव्हेंबर ते आजच्या तारखेपर्यंत पीएमपीएमएलच्या चार बस जाळल्या आहेत. सुदैवाने कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावर प्रशासनाकडून प्राथमिक स्तरावर तरी शॉर्ट सर्किटचे कारण देण्यात येत आहे. उन्हाळ्यात या कारणामुळे आग लागते. मात्र एकाच आठवड्यात आणि भर हिवाळ्यात चार बसमध्ये शॉर्ट सर्किट होणे हा योगायोग विचार करण्यासारखा आहे. याबाबत तपास सुरू आहे. भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येईलही पण इतक्या मोठ्या प्रमाणात बसच्या दुरुस्तीवर खर्च होत असतानाही असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. नुकत्याच एका खासगी ठेकेदारासोबतचा करार रद्द करून 200 बस प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. आग लागत असलेल्या बहुतांश बस त्यातील असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे खासगी ठेकेदारांच्या बसच्या दर्जावर प्रश्नचिन्ह कायम आहे.