प्रवाशांच्या फसवणूक प्रकरणी युरोशिया हॉलिडेज क्लबचे दोघे गजाआड

0

पुणे – हॉलिडेज पॅकेजच्या नावावर अनेकांना २२ लाख १८ हजार ८५२ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यातील कल्याणीनगर भागात उघड झाला असून या प्रकरणी पोलिसांनी युरोशिया हॉलिडेज क्लबच्या दोन आरोपींना अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉली कैऱ्ही खिचे (वय ३२, रा. येरवडा, मुळगाव-मणिपुर) आणि कुशल नंदकुमार पानसरे (वय २२, लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघां आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात यापूर्वी एकाला अटक करण्यात आली आहे. तर हेमंत भुजबळ (रा. चंदननगर) हा फरार आहे. याप्रकरणी बिभीषण नामदेव गुणवरे (वय ३०, रा. शेवाळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर भागात मे महिन्यात ही घटना घडली. आरोपींनी कल्याणीनगर येथे युरोशिया हॉलिडेज क्लब प्रा. लि. नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना आकर्षक हॉलिडेज पॅकेज देण्याच्या नावावर अनेकांची फसवणूक करण्यात आली. आतापर्यंत आरोपींनी २२ लाख १८ हजार ८५२ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. फिर्यादी यांची ६३ हजार २३१ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी आरोपींनी आणखी काही लोकांची फसवणूक केल्याची शक्यता असल्याने याबाबत तपास करण्यासाठी तसेच गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी आणि फरार साथीदारांच्या शोधासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली. तसेच कल्याणीनगर येथील ज्या नागरिकांची फसवणूक झाली असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.