प्रवाशांच्या सेवेसाठी करण्यात आलेले नियम ठरले बिनकामाचे

0

भुसावळ। राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये सर्वसाधारण प्रवाशांव्यतिरिक्त इतर असलेल्या शासकीय, विशेष व्यक्ती व स्वातंत्र सैनिक, दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आसनांचा योग्य तो वापर होत नसल्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी करण्यात आलेल्या नियमांचे खुद्द प्रवाशांकडूनच उल्लंघन केल्या जात आहे. त्यामुळे राज्यपरिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सेवेसाठी निर्माण करण्यात आलेल्या अनेक योजना व नियमांचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहेत.

एस.टी.मध्ये दहा प्रवाशांसाठी आरक्षित जागा
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एसटी या-ना-त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. सध्या अशाच एका नियमाने एसटी चर्चेत आहे. ते म्हणजे विशेष व्यक्तींसाठी कायम आरक्षित करण्यात आलेल्या आसनांमुळे नेहमीच कोठे ना कोठे वाद होताना दिसत आहेत. एसटी बसेसमध्ये सर्वसामान्य प्रवासी सोडले तर इतर विशेष अशा दहा प्रवाशांसाठी राखीव जागा आरक्षित केलेल्या असतात. यामध्ये दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांसाठी, स्वातंत्र सैनिक, महिलांसाठी, राज्य परिवहन मंडळातील कर्मचारी, वाहकांसाठी आणि विद्यार्थी अशा प्रकारच्या प्रमुख जागा आरक्षित केलेल्या आहेत.

उभे राहून करावा लागतो प्रवास
प्रवाशांकडून आरक्षित जागांचे नियम पाळले जात नाहीत. तसेच त्यांना याबाबत योग्य त्या सूचनाही वाहकांकडून केल्या जात नसल्याचे दिसून येते. महिन्याला एसटीचा पास काढून प्रवास करणार्‍या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडूनही नियमांचे सर्वाधिक उल्लंघन केले जाते. मात्र त्याचा त्रास त्यांनाही सहन करावा लागतो. एसटीमध्ये प्रवाशांची बसण्याची क्षमता मर्यादित करुन देखील प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थी एसटी बसेसमधून प्रवास करतात. त्यामुळे त्यांना काही वेळा उभे राहून प्रवास करावा लागतो.

ठोस उपाय करावेत
आरक्षित जागेवर बसण्यावरुन नेहमीच महिला व पुरुषांमध्ये अनेक वेळा वादावादीचे प्रसंग घडतात. मात्र अशावेळी तात्पुरत्या स्वरूपात वाहकाकडून पुढाकार घेऊन हे वाद मिटविले जातात. मात्र याबाबत महामंडळाजवळ कायमस्वरूपी नियमांच्या अंमलबजावणीसाठी ठोस असे कोणत्याच उपाययोजना नाहीत. अनेक वेळा प्रवाशांकडून एसटीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामध्ये वाहक व चालकांचाही समावेश असतोच. धूम्रपान करु नये, स्वच्छता राखावी अशा अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. सध्या बसगाडीमध्ये महिलांना बसण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या बैठकीच्या जागेवर पुरुष तसेच विद्यार्थी बसतात, तर दिव्यांगाच्या व संकटकालीन मार्गाच्या जागी कोणीही बसलेले दिसून येते. त्यामुळे गाडीत प्रवास करण्यासाठी आलेल्या दिव्यांग प्रवाशाला त्याची हक्काची जागा असूनदेखील बसता येत नाही. किंवा त्यांनी वाहकाला विनंती केल्यास त्यांच्याकडूनही लक्ष दिले जात नाही.