यशवंतीमुळे मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर भागातील प्रवाशांना मिळाला होता दिलासा
भुसावळ (विजय वाघ)- कमी प्रवाशांना घेवून प्रवाशांची तत्काळ सेवा बजावणारी यशवंती अवघ्या चार मन्यिातच आगारातून हद्दपार झाल्याने रावेर, यावल, मुक्ताईनगर व बोदवड या भागातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य परीवहन महामंडळाने 54 प्रवाशी क्षमता असलेल्या बसमधील प्रवाशांची तोकडी संख्या पाहता परीवहन महामंडळाने राज्याच्या प्रत्येक आगारात 30 प्रवाशी क्षमता असलेली यशवंती या नावाची बससेवा सुरू केली होती. यामुळे ‘भरली की चालली’ अशा कमी प्रवाशी संख्येवर यशवंती रस्त्यावर धावू लागल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला होता.
दुरुस्तीमुळ बसेस झाल्या हद्दपार
यशवंती मिनी बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात होती. परीणामी यशवंतीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे इंजिनमध्ये वारंवार बिघाड निर्माण होत होता. यामुळे या बसेस दुरूस्तीसाठी टाटा कंपनीकडे दुरूस्ती पाठवल्या जात होत्या मात्र यशवंतीच्या वारंवार दुरूस्तीला कंटाळून कंपनीने अखेर या बसेस कंपनीकडे जमा केल्याने आगारातील यशवंती वर्षभरापासून हद्दपार झाली आहे.
टाटा कंपनीशी करार
राज्य परीवहन महामंडळाने टाटा कंपनीशी करार करून राज्याच्या प्रत्येक आगारात किमान 20 किलोमीटर अंतरावर धावणारी यशवंती ही बससेवा सुरू केली होती. यासाठी परीवहन महामंडळाने टाटा कंपनीशी केलेल्या करारानुसार यशवंतीच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी टाटा कंपनीकडेच होती मात्र वारंवारच्या दुरूस्तीमूळे कंपनीने चार महिन्यातच यशवंती या बसेस जमा करून घेतल्या आहेत.
आगारात प्रत्येकी दोन यशवंती
परीवहन महामंडळाने इतर आगाराप्रमाणेच भुसावळ आगाराकडे दोन बसेस सोपवल्या होत्या. आगारातील या बसेस मुक्ताईनगर आणि बोदवड या मार्गावर तर यावल आगारातील यशवंती भुसावळ मार्गावर प्रवाशांना बससेवा पुरवीत होती. यामुळे यावल, मुक्ताईनगर आणि बोदवड या भागातील प्रवाशांच्या वेळेची बचत होवून त्यांना दिलासा मिळाला होता.
आगारात नवीन बसेस
राज्य परीवहन महामंडळाने सुरूवातीला आगारात 54 प्रवाशी क्षमता असलेली बससेवा सुरू केली होती. या बसला मागच्या डाव्या बाजूने दरवाजा होता. यानंतर मात्र आता परीवहन महामंडळाने आगारात 45 प्रवाशी क्षमता असलेली नवीन बससेवा सुरू केली असून या बसचा चालकाच्या डाव्या बाजूने पुढील भागात दरवाजा आहे. यामुळे प्रवाशांची चढ-उतार चालकाला सहज दिसुन येते.
खाजगी प्रवाशी वाहतूकीवर झाला होता परीणाम
आगारातील यशवंती भरली की चालली या सेवेमुळे प्रवाशांनी खाजगी प्रवाशी वाहनधारकांकडे पाठ फिरवली होती. यामुळे यशवंती बससेवेला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळाल्याने खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या वाहनधारकांवर याचा चांगलाच परीणाम झाल्याचे दिसून आले होते.