भुसावळ : तब्बल अडीच वर्षानंतर बंद झालेली सुरत-भुसावळ पॅसेंजर 9 जूनपासून सुरू होत असल्याचे नोटीफिकेशन वेस्टर्न रेल्वेने काढल्यानंतर प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत असतानाच अचानक पुढील आदेशापावेतो ही गाडी स्थगित करण्यात येत असल्याचे पत्र पश्चिम रेल्वेने काढल्याने प्रवाशांसह चाकरमान्यांमध्ये नाराजी पसरली होती मात्र आता बुधवार, 15 जूनपासून ही गाडी चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने अधिकृतरीत्या जाहीर केला आहे. दरम्यान, यापूर्वी ही सायंकाळी साडेसहा वाजता भुसावळ स्थानकावरून 59014 या क्रमांकाने सुटायची मात्र आता ही गाडी पॅसेंजरऐवजी ही गाडी एक्स्प्रेस स्वरूपात धावणार असून तिचा क्रमांक 19006/190005 असा करण्यात आला आहे शिवाय आधीच्या वेळेपेक्षा ही गाडी एक तास उशिराने धावणार आहे.
सुरतहून 13 पासून तर भुसावळातून 15 पासून सुटणार गाडी
पश्चिम रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार सुरत-भुसावळ एक्स्प्रेस सुरत स्थानकावरून भुसावळसाठी 13 जून रोजी तर 15 जूनपासून भुसावळ येथून सुरतसाठी धावणार आहे. चाकरमान्यांसह व्यापारी व खान्देशातील प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची असलेली गाडी सुरू होत असल्याने प्रवाशांमध्ये आनंद पसरला आहे. पॅसेंजर गाडीला आता एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आल्याने अर्थातच प्रवासी भाड्यातही वाढ करण्यात आली आहे मात्र थांबे पॅसेंजरप्रमाणे कायम ठेवण्यात आले आहेत.
असे आहे गाडीचे अप-डाऊनमध्ये वेळापत्रक
गाडी क्रमांक 19005 सुरत-भुसावळ ही गाडी 13 जून रोजी रात्री 11.10 वाजता सुरत स्थानकातून सुटल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी 7.55 वाजता भुसावळात पोहोचेल तर गाडी क्रमांक 19006 भुसावळ-सुरत गाडी सायंकाळी 7.30 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटल्यानंतर दुसर्या दिवशी सुरतला पहाटे 5.15 वाजता पोहोचणार आहे.
असे आहेत गाडीचे थांबे व बोगी संरक्षण
या गाडीला भादली, जळगाव, पाळधी, चावलखेडे, धरणगाव, भोणे, टाकरखेडे, अमळनेर, भोरटेक, पाडसे, बेटावद, नरडाणा, होळ, सिंदखेडा, सोनशेलू, विखरण रोड, दोंडाईचा, रनाळा, टिसी, नंदुरबार, खांडबारा, चिंचपाडा, नवापूर, उकई, नवा सोनगड, व्यारा, माही, बारडोली, चलथान, उधना असे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला दोन एसी थ्री टायर, आठ स्लीपर, सात द्वितीय श्रेणी बोगी (दोन गार्ड ब्रेक वॅनसह) कनेक्ट असतील. दरम्यान, ही एक्स्प्रेस गाडी क्रमांक 19127/11128 भुसावळ कटनी एक्स्प्रेसला कनेक्टेड असेल. सुरत एक्स्प्रेसचे चार डबे कटनी एक्सप्रेसला जोडण्यात येणार असून 12 डब्यांची गाडी आता भुसावळ ते कटनी दरम्यान धावणार आहे.