भुसावळ- जळगाव रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकींग खिडकीजवळ उभ्या असलेल्या प्रवाशाच्या खिशातून 19 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल लांबवणार्या मालेगावच्या चोरट्यास लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अलिमखान अलिसखान (20, गुलशन नगर, मालेगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. जळगावचे तकारचे पारस महेंद्रसिंग राजपूत हे जळगाव रेल्वे स्थानकावरील बुकींग खिडकीवर उभे असताना 15 मे रोजी त्यांचा 19 हजार 500 रुपये किंमतीचा महागडा मोबाईल चोरट्यांनी लांबवला होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या तपासात हा गुन्हा अलिम खान याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास गुरूवारी अटक करण्यात आली. ही कारवाई लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिलीप गढरी यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय भरत शिरसाठ, हवालदार आनंद नगराळे, नाईक शैलेश पाटील यांच्या पथकाने केली.