जळगाव। बसमध्ये चढत असलेल्या प्रवाश्याच्या खिशातून अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी जिल्हा पोलिसांनी मंगळवारी दुसर्या संशयिताला अटक केली आहे. यातच पोलिसांनी चोरीला गेलेला मोबाईलही पहिल्या संशयिताकडून हस्तगत केला आहे. दरम्यान, दुसर्या संशयिताला मंगळवारी दुपारी न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
बसमध्ये चढतांना लांबविला मोबाईल
धुळे येथील देवपुर परिसरातील जयहिंन्द कॉलनीत वास्तव्यास असलेले उमाकांत प्रभाकर बडगुजर हे काही कामानिमित्त जळगावात आले होते. काम आटोपून 9 मार्च 2017 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास नवीन बस स्थानकावर आल्यानंतर धुळे येथे जाणार्या बसमध्ये चढत असतांना त्यांच्या खिशातून अज्ञात चोरट्याने 6 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी उमाकांत बडगुजर यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिस संशयितांचा शोध घेत असतांना 10 जुलै रोजी नवाज समीर खान पठाण याला अटक केली होती. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तर पोलिस त्याच्या इतर साथीदारांच्या शोधार्थ होते.
पत्ता बदलून रहायचा दुसरा संशयित
जिल्हापेठ पोलिस नवाज याच्या इतर साथीदारांच्या शोधात असतांना दुसरा साथीदार शकील सामीर खॉन पठाण वय-30 हा बचावासाठी पत्ता बदलून राहत होता. त्यामुळे पोलिसांना त्यास अटक करण्यात दमछाक होत होती. अखेर तो तांबापुरा येथील मुळ पत्यावर न राहता सुप्रिम कॉलनी येथील मच्छी मार्केट येथे राहत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी शिवाजी पवार यांना मिळाली असता त्यांनी मंगळवारी सकाळीच शकील याला सुप्रिम कॉलनीतून अटक केली. या अगोदरच नवाज या संशयिताकडून चोरीला गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला होता. दरम्यान, शकील याची चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरीची कबूली दिली. तर तिसरा संशयित अयमद उर्फ अटॅक हा अद्याप फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहे.
न्यायालयीन कोठडीत रवानगी
मोबाईल चोरी प्रकरणी संशयित चोरटा शकील सामीर खान पठाण यास मंगळवारी दुपारी जिल्हा पेठ पोलिसांनी न्यायाधीश के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. मोबाईल चोरीप्रकरणी न्यायालयात कामकाज होवून संशयितास न्या. कुलकर्णी यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. शकील याच्याविरूध्द रेल्वे पोलिसातही मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने या अगोदर कुठे-कुठे चोरी केल्या याचा तपास पोलिस घेत आहेत.