पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतली गंभीर दखल
मुंबई- लोकल सेवा अखंड चालावी म्हणून ऊन-पावसात रुळांची सुरक्षा सांभाळणारा एक ट्रॅकमन लोकल प्रवाशाच्या अमानवी व विकृत मनोवृत्तीचा बळी ठरला. दरवाजात उभ्या असलेल्या एका धावत्या लोकलमधील प्रवाशाने लाथ मारल्याने श्रावण सानप (47) हे ट्रॅकमन त्याच लोकलवर धडकले व त्यांचा मृत्यू ओढवला. पश्चिम रेल्वे प्रशासनाने या कृतीची गंभीर दखल घेतली असून, आरोपीला जेरबंद करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी आणि लोअर परळ स्थानकादरम्यान सानप (47) अन्य आठ सहकार्यांसोबत रुळांच्या सुरक्षेची पाहणी करीत होते. दुसर्या बाजूने लोकल येत असल्याचे सर्वजण दोन रुळांच्या मध्ये उभे राहिले. पण चर्चगेटच्या दिशेने जाणार्या धावत्या लोकलमध्ये दरवाजावर लटकणार्या एका प्रवाशाने त्यांना लाथ मारली. ती सानप यांच्या वर्मी बसली व ते त्याच लोकलच्या दरवाजाकडील एका आपत्कालीन शिडीस आदळले. त्यात गंभीर जखमी झालेल्या सानप यांना नायर रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू ओढवला. कल्याणमध्ये राहणार्या सानप यांना पत्नी, दोन मुली व दोन मुले आहेत.