पुणे :- मध्यरात्री बसमधून प्रवाशाला खाली उतरवणा-या वाहक चालकाला निलंबित करण्यात आले आहे. महिला आरक्षित जागेवरून पुरुषाला उठविण्याची मागणी वाहक यांच्याकडे केली होती. परंतू वाहकाने काय तेवढेच काम आहे का असे सांगत त्यांना शिवीगाळ करून बसमधून खाली उतरवले होते. चंद्रकांत भिकोबा पवार (चालक), सौरभ बबन पवार (वाहक) अशी निलंबित कर्मचा-यांची नावे आहेत.
रविवारी मध्यरात्री स्वारगेट ते कात्रज या पीएमपी रातराणीने हनुमंत पवार त्यांच्या पत्नी मुलगी आणि पुतणी सोबत प्रवास करीत होते. त्यावेळी महिला आरक्षित जागेवरून पुरुषांना उठवून आपल्या पत्नी आणि मुलीला बसण्यासाठी जागा द्यावी यासाठी वाहक सौरभ पवार यांच्याकडे मागणी केली होती. परंतु पवार यांनी त्यांच्याशी वाद करत त्यांना बसमधून खाली उतरविले होते. याबाबत पवार यांनी पोलिसांशी संपर्क साधला असता पोलीस उपनिरीक्षक भागवत बडे यांनी पवार यांची फिर्याद लिहून न घेता उलट त्यांनाच वाईट वागणूक दिली. तसेच चालकाने बस पोलीस ठाण्यात न नेता थेट कात्रज बसस्थानकावर नेली. अखेर पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्यावर मुख्यमंत्री कार्यालयातून याची दखल घेण्यात येऊन आयुक्तांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच घटनेची तक्रार द्यायला गेल्यानंतर हद्दीचा वाद घालत उलट तक्रारदाराचीच उलट तपासणी करणा-या पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. भागवत बडे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.