प्रवासी झोपताच सव्वा लाखांचा ऐवज लंपास : महानगरी एक्स्प्रेसमध्ये चोरी

भुसावळ : रेल्वे गाड्यांमधील वाढत्या चोर्‍यांमुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे. प्रवासी झोपल्याची संधी साधून चोरट्याने सुमारे सव्वा लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास ठाणे-नाशिक दरम्यान महानगरी एक्स्प्रेसमध्ये घडली.

चोर्‍या वाढल्याने प्रवाशांमध्ये भीती
किरण शशीकांत अग्रवाल (ठाणे) हे ठाणे-बर्‍हाणपूर दरम्यान महानगरी एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस-13 या डब्यातील 42 नंबरच्या सीटवर बसून प्रवास करीत होते मात्र ठाण्यावरून गाडी सुटल्यावर त्यांना झोप लागताच चोरट्याने बॅग लांबवली. या बॅगेत मोबाईल, तीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दहा हजार रूपये रोख असा मुद्देमाल होता. ठाणे ते नाशिक या दरम्यान बॅगेची चोरी झाली. याप्रकरणी किरण अग्रवाल यांनी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा नाशिक लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.