प्रवासी महिलेची पर्स लांबविणार्‍या चोरट्याच्या शोधार्थ बस पोलीस ठाण्यात

0

जळगाव-जामनेर बसमधील प्रकार ; पर्समधील मोबाईल, अडीच हजार रोख, कागदपत्रे लंपास

जळगाव :  बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने विवाहितेची अडीच हजार रुपये रोख, एक मोबाईल, एटीएमकार्ड, व पॅनकाड पर्स लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी नवीन बसस्थानकात जळगाव-जामनेर बसमध्ये घडली. बस आकाशवाणी चौकात आल्यावर पर्स नसल्याने लक्षात आल्यावर महिलेने चोरटा बसमध्ये असावा या शंकेने त्याच्या शोधार्थ बस जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणली. यामुळे तासभर इतरही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 

बोदवड तालुक्यातील कुर्‍हा माहेर असलेल्या रूपाली किशोर अवकाळे (वय 29) या बॅकेंच्या कामानिमित्त सोमवारी जळगावात आल्या. हे काम आटोपून त्या सासरी जामनेर येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्या. काही वेळाने जळगाव-जामनेर (क्र. एम.एच. 20 बी.एल. 3362) बस लागली. रुपाली सोबत असलेल्या तरुणीसह जामनेर बसमध्ये बसल्या. यानंतर बसमध्ये जामनेरकडे रवाना झाली. 

तिकिट काढतेवळी आला प्रकार लक्षात
बसस्थानकातून गाडी बाहेर निघाली. मार्गस्थ झाल्यावर महिला वाहक तिकिट काढण्यासाठी रुपाली अवकाळे यांच्याकडे आल्या. अवकाळे यांनी पैसे काढण्यासाठी पर्स बघितली असता ती गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत बस आकाशवाणी चौकात पोहचली होती. यावेळी वाहतूक पोलिसांनी प्रकाराबाबत विचारपूस केली केली. महिलेला विचारणा करुन तुम्हाला शंका असल्यास बस जिल्हापेठ पोलीस ठाण्यात घेवून जा असा सल्ला दिला. त्यांनतर महिलेच्या सुचनेवरुन बसवाहक व चालकाने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेली. याठिकाणी सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात येवून, महिलेची तक्रारीची नोंद घेवून बस जामनेरकडे मार्गस्थ झाली. दरम्यान या प्रकारामुळे तासभर ताटकळत उभ रहावे लागल्याने प्रवाशांचा मनस्ताप झाला होता. महिलेची तक्रार पोलिसांनी लिहून घेतली. बसस्थानकात सिसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज घेऊन चोरट्यांचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.