प्रवासी महिलेची सोनसाखळी तोडली

0

जळगाव।  रक्षाबंधनासाठी मनवेल येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर आललेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी तोडून अज्ञात चोरट्याने त्यातील पेन्डल, तीन वाट्या तसेच चार मणी असे चार ते पाच ग्रॅमचे सोने लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, महिलेस दोन जणांवर संशय आल्यामुळे थेट बस जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात नेण्यात आली. मात्र, त्या, संशयित युवकांची तपासणी केल्यानंतर त्यांच्यकडे काहीही मिळून आले नाही. अखेर सायंकाळी बस जिल्हा पेठ पोलिस ठाण्यातून मनवेलच्या मार्गाने रवाना झाली.

चार ते पाच ग्रॅम सोने लंपास
वंदना साहेबराव बिर्‍हाडे या महिला शहरातील खोटेनगर येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी दुपारी त्या रक्षाबंधनानिमित्त यावल तालुक्यातील मनवेल येथे जाणार असल्यामुळे नवीन बस्थानकावर आल्या. दुपारी 3 वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकाच्या फलाटावर जळगाव-यावल बस (क्रं.एमएच.19.बीटी.1873) उभी होती. फलाटावर बस उभी पाहून वंदना बिर्‍हाडे ह्या बॅग घेवून बसमध्ये चढल्या आणि हातातील बॅग ठेवत असतांना अचानक त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खाली पडली. बॅग ठेवल्यानंतर बिर्‍हाडे यांना सोनसाखळी खाली कशी काय पडली याचा संशय आला. त्यांनी लागलीच सोनसाखळी उचलून त्याची तपासणी केली असता त्यातील सोन्याचे पेन्डल तसेच चार मणी व तीन ते चार वाट्या ह्या गायब झालेल्या दिसून आल्या. बसमध्ये चढतांनाच गर्दीचा फायदा घेवून कुणी तरी अज्ञात चोरट्याने सोनसाखळी तोडून इतर दागिने चोरल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी लागलीच जवळच बसस्थानक परिसरात असलेल्या जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचार्‍यास बोलवून दागिने चोरी झाल्याची संपूर्ण हकीकत सांगितली.

पोलिस ठाण्यात नेली बस
महिलेची सोनसाखळी चोरीला गेल्याची खबर संपूर्ण बसमध्ये पसरताच खळबळ उडाली. वंदना बिर्‍हाडे यांनी पोलिस कर्मचार्‍यांनी हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी जवळच उभे असलेले दोन युवकांवर संशय व्यक्त केला. तसेच बसची तपासणी करण्याची मागणी केली. यानंतर पोलिस कर्मचार्‍यांनी चौकशीसाठी थेट जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितल्यावर चालकाने बस पोलिस ठाण्यात आणली. यानंतर संशय असलेल्या युवकाची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडे पोलिसांना काहीही मिळून आले नाही. तर बसचीही पाहणी केल्यानंतर त्यातही पोलिसांना दागिने मिळून आले नाही. अखेर अज्ञात चोरट्याने ते चोरून नेल्याची खात्री झाली.

अन् बस यावलसाठी मार्गस्थ
बसची तपासणी झाल्यानंतर वंदना बिर्‍हाडे या महिला तक्रार देण्यासाठी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांना चोरी झालेल्या दागिन्यांच्या पावत्या आणा, त्यानंतर तक्रार दाखल करू सल्ला देण्यात आला. त्यामुळे वंदना बिर्‍हाडे ह्या तक्रार न करता तेथून निघुन गेल्या. यानंतर जळगाव-यावल बस ही पुन्हा आपल्या मार्गावर लागली.