तर्हाडी। नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या शहादा तालुक्यातील कोडली येथील रहिवाशी प्रविण सुरेश महाजन यांना जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय विश्वविनायक प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेहरू युवा केंद्र संलग्न क्रांतिग्राम संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा राष्ट्रीय विश्वनायक प्रेरणा पुरस्कार 9 ऑगस्ट क्रांतीदिनी नवी दिल्ली येथील माळवणकर सभागृहात नुकताच प्रविण महाजन यांना देण्यात आला.
दिल्ली येथे झाले पुरस्कार वितरण
मानव संसाधन व विकास विभागाचे अध्यक्ष सत्यनारायण जेटीया, भारताचे उच्चायुकत ज्ञानेश्वर मुळे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुरेश यादव, औरंगाबाद विद्यापीठाचे प्रा.सुरेश गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रविण महाजन यांना देण्यात आला. प्रविण महाजन हे सध्या पुणे येथे स्थायिक असून ते पुण्यातील युवकमित्र परिवाराचे संस्थापक असूून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात माध्यमिक व उच्च प्राथमिक, विनाअनुदानित शाळांमध्ये संगणक कक्ष व ग्रंथालये स्थापन करत असतात. त्यांच्या प्रयत्नाने तर्हाडीच्या जि.प.शाळेत पुस्तके भेट देण्यात आली. आदिवासी गोरगरीब, शालेय विद्यार्थ्यांना पुणे येथील विविध सेवाभावी संस्थाच्या मदतीने शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे काम प्रविण महाजन व त्यांचे सहकारी मित्र हे काम करत असतात. यापुर्वी महाजन यांना उत्कृष्ट माहिती अधिकारी कार्यकर्ता, विविध निबंध व वादविवाद स्पर्धा मधील पारितोषिकांनी त्यांना गौरविण्यात आले. येत्या 3 वर्षात धुळे व नंदुरबार जिल्ह्यात संगणक कक्ष नसणार्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये संगणक कक्ष व ग्रंथालये स्थापन करण्याचा मानस असल्याचे महाजन यांनी सांगितले.