शिरगाव:येथील प्रयोगशील शेतकरी व उद्योजक प्रवीण साहेबराव गोपाळे यांना नुकताच राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण नुकतेच पुणे येथील टिळक स्मारक मंदिर येथे झाल्याची माहिती गोपाळे यांनी दिली. मनुष्यबळ लोकसेवा आकादमी व राज्यस्तरीय गुणीजन महापरीषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यापुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुणीजन परिषदेचे अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे पत्रकार प्रकाश सावंत, के.एल. गोगावले व अमोल सुपेकर उपस्थित होते.
हे देखील वाचा
आर.टी.भात लावणीचा प्रयोग यशस्वी
हा पुरस्कार महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकर्यांना दिला जातो. आपल्या शेतात नवीन प्रयोग करणार्या व पर्यावरण पूरक शेती करणार्या शेतकर्यांना देण्यात येतो. ज्यामुळे नवीन होतकरू शेतकरी निर्माण व्हावेत आणि पर्यावरणाला धोका पोचू नये. तरूणांचा शेतीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलावा हा प्रमुख उद्देश या पुरस्काराच्या मागे असल्याचा समजतो. प्रवीण गोपाळे यांनी गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून भरघास उत्पन्न मिळवले आहे. तसेच त्यांचा आर.टी.भात लावणीचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली असल्याचे समजते. मागील वर्षी त्यांना पुणे जिल्हा परिषदेचा कृषी निष्ठ पुरस्कार मिळाला होता. याबद्दल गोपाळे यांनी सांगितले की, शेतीचे काम इमाने इतबारे केली तर प्रत्येकाला यश मिळू शकते. आपल्या आयुष्यात प्रत्येकाने अशीच प्रामाणिकपणे शेती केली तर पुरस्कार तर मिळतीलच परंतु उत्पन्न अमाप मिळेल आणि आपोआप गरिबी नष्ट होईल.