प्रवेशद्वारावर सेस वसुली अडचणीची ठरणार

0

कात्रज । मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागात प्रवेशद्वारावर नियमानुसार आडत्यांनाच विक्रीच्या वेळी सेस वसुली करावी लागणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने प्रवेशद्वारावर सेस वसूल करण्याचा प्रस्ताव दिला होता. यावर बाजार समिती प्रशासनाकडून प्रवेशद्वारावर सेस वसूल करणे अडचणीची असल्याची भूमिका घेण्यात आली आहे.

चार-पाच शेतकरी माल विक्रीस
बाजारात माल घेऊन जाताना भाव ठरला नसल्याने सेस घेणे अवघड आहे. दुसरीकडे माल विकून शेतकरी परत जातानाही सेस वसूल करणे प्रॅक्टिकली शक्य नाही. एका टेम्पोमध्ये चार-पाच शेतकरी माल विक्रीस आणतात. कित्येकदा तो केवळ चालकाच्या भरवशावर माल पाठविला जातो. त्यामुळे चालकाला थांबून सर्व पावत्या दाखवून सेस देणे शक्य नाही. तर शेतकरी जरी माल विक्रीस आला. तर तो चार-पाच व्यापार्‍यांकडे थोडा-थोडा विकत असतो. त्यामुळे सर्व पावत्या देऊन सेस भरणे शेतकर्‍याला अवघड आहे. बाजार समितीने तसा प्रयत्न केल्यास सेस वसुलीच्या ठिकाणी गाड्याच्या लांबच लांब रांगा लागतील. बाजारात पुन्हा वाहतूककोंडी होईल. त्यामुळे प्रॅक्टिकली ते शक्य नाही. नियमानुसार सेस वसुली करणे आडत्यांची जबाबदारी आहे. ती त्यांनीच वसूल करणे योग्य ठरेल. याबाबत व्यापार्‍यांशी चर्चा करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

12 दिवसांपासून फळ, भाजीपाला
नुकताच बी.जे. देशमुख यांनी बाजार समितीचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी फळे, भाजीपाला विभागात सुरुवातीला सुकाणू समिती नेमली. त्यानंतर नवीन नियमावली तयार करून अनेक वर्षांपासून बाजार घटकांना त्रासदायक ठरणारा वाहतूककोंडीचा अनेक प्रश्‍न सोडविला. मागील 12 दिवसांपासून फळ, भाजीपाला विभागातील वाहतुक सुरळीत झाली आहे. आता देशमुख यांनी समस्या सोडविण्यासाठी फूल बाजार आणि भुसार बाजारात लक्ष घातले आहे. या पार्श्‍वभूमीवर सेसही प्रवेशद्वारावर वसूल करण्याबाबत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लागावा, अशी मागणी आडत्यांकडून होत आहे. मात्र, हे प्रॅक्टिकली शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.

आडत्यांसमोर अनेक अडचणींना
खरेदीदारांकडून प्रती शेकडा 1 रुपया 5 पैसे सेस वसूल आकारण्याचा नियम आहे. हा सेस वसूल करताना फळ, भाजीपाला विभागातील आडत्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तर कित्येक खरेदीदार सेस देण्यास टाळाटाळ करतात. याची झळ आडत्यांना बसते. त्यामुळे सेस मार्केट यार्डच्या प्रवेशद्वाराजवळ वसूल करावी, अशी मागणी 2005पासून आडत्यांकडून होत आहे. आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सहा महिन्यांपूर्वी याबाबतचा प्रस्ताव बाजार समितीकडे दिला आहे. सेस वसुलीसाठी आडते ग्राहकांना पावत्या देऊन बाजार समितीला सहकार्य करण्यास तयार आहेत. बाजार समितीने व्यवस्था करून प्रवेशद्वारावरच सेस वसूल करण्याची मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे.