मुंबई । खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत झालेला गोंधळ आणि त्याबाबत प्रशासकीय यंत्रणांची थंड भूमिका यामुळे आता पालक आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पहिल्या फेरीतच प्रवेश मिळावा अथवा पुढील फेरीत प्रवेशाची खात्री वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने द्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी पदव्युत्तर (एमडी, एमएस) अभ्यासक्रमांचे प्रवेश देण्यास नकार दिल्यामुळे जवळपास अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांना गुणवत्तायादीत नाव असूनही प्रवेश मिळाला नाही.
खासगी संस्थांबाबत शासकीय यंत्रणांनी मात्र थंड भूमिका घेतली आहे. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, पुढील फेरीत रिक्त राहिलेल्या जागांवर या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. पुढील फेरीतील प्रवेशाची खात्री नसल्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.