प्रवेशावेळी मतदार नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य

0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी मतदार यादीमध्ये नाव नोंदवून घेईल, असे प्रतिज्ञापत्र देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे मतदार नोंदणीची मोहीम यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या पाहणीमध्ये मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याबाबत विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य शासनाने याबाबतची पावले उचलली आहेत.

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेताना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे प्रतिज्ञापत्र देण्याबरोबर प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना भेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांनी तसेच विद्यापीठातील सर्व विभागप्रमुखांनी याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिल्या आहेत.