प्रवेशासाठी शिक्षकांचा अनोखा उपक्रम

0

भुसावळ । तालुक्यातील तळवेल बॉईज येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली प्रवेशासाठी वर्गशिक्षिका ज्योती बेलसरे अनोखा उपक्रम राबवत आहेत. त्याअंतर्गत सेमी इंग्रजी व नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माहितीचे पत्रक गावात वाटण्यात येत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांचे रूप पालटत आहेत. अनेक पालक व मुलांचा जिल्हा परिषद शाळांकडे ओढा वाढलेला आहे. यालाच अनुसरून आपल्या शाळेत राबविणार्‍या विविध उपक्रमांची माहिती पत्रकात छापून ही पत्रके घरोघर वाटण्याचे काम श्रीमती ज्योती बेलसरे करीत आहेत.

नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाताहेत
गटशिक्षणाधिकारी विजय पवार व मुख्याध्यापिका ज्योत्स्ना कोचूरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. त्याला गावातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. मोफत प्रवेश, गणवेश, पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्ती, आनंददायी शिक्षण पद्धती, ज्ञानरचनावादी अध्ययन – अध्यापन, ई-लर्निंग, संगणक शिक्षण, मातृभाषेतून इंग्रजीकडे वाटचाल, शैक्षणिक सहलींचे आयोजन, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, आरओ पाण्याची व्यवस्था, व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास, कृतीद्वारे शिक्षण, प्रोजेक्टरद्वारे इंग्रजीचे अध्यापन असे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये राबविले जात आहेत. शेजारीच असलेल्या तळवेल कन्या शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पालकांनी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.