पाटना: प्रसिद्ध राजकीय जाणकार जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर आणि माजी राज्यसभा खासदार पवन वर्मा यांची जेडीयूतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षाध्यक्ष नितीशकुमार यांनी ही कारवाई केली आहे.
जेडीयूचे मुख्य सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी याबाबत माहिती दिली आहे. पक्षाची शिस्त, पक्षाचा निर्णय आणि पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास हाच पक्षाचा मूळमंत्र असतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पक्षाचे पदाधिकारी असतानाही प्रशांत किशोर यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली जी पक्षाच्या निर्णयाविरोधात होती. त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या नितिशकुमार यांच्याविरोधात त्यांनी अपमानास्पद शब्दांचा वापरही केला. यानंतर किशोर यांची भाषा आणखी खालच्या स्तराला जाऊ नये यामुळे त्यांना पक्षातून मुक्त करणे गरजेचे होते असे त्यागी यांनी सांगितले.
नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर लगेचच प्रशांत किशोर यांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी नितीश कुमार यांना धन्यवाद देत देव तुमचं भलं करो असं म्हटलं आहे.