जळगाव। रिधूर वाड्यातील प्रशांत सोनवणे याचा सन 2012 मध्ये 7 जुलैच्या रात्री खुन करण्यात आला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शेळगाव शिवारातील शिव नाल्याजवळ मिळून आला होता. यानंतर खटला न्यायलयात सुरू झाला. या खून खटल्यात मंगळवारी संशयित नगरसेवक कैलास सोनवणेंसह 13 जणांची न्यायाधीश के.बी.अग्रवाल यांनी सबळ पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यातील दोन संशयीत घटना घडल्यापासून कारागृहात होते.
शेळगाव शिवारात आढळला होता मृतदेह
रिधूर वाड्यातील प्रशांत आंबादास सोनवणे (वय 25) याचा 7 जुलै 2012 रोजी खून करून त्याचा मृतदेह शेळगाव शिवारातील शिवनाल्याजवळ अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. त्यावरून त्याची आई राधाबाई अंबादास सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 8 जुुलै 2012 रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात सुरूवातीला नरेंद्र डिंगबर सपकाळे, लक्ष्मी नरेंद्र सपकाळे, प्रदीप सुधाकर पाटील अनुसयाबाई जनार्दन कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना 9 जुलै 2012 रोजी अटक करण्यात आली होती.
यांची झाली निर्दोष मुक्तता
फिर्यादी राधाबाई सोनवणे यांच्या अर्जावरून संशयीत म्हणून प्रल्हाद नारायण सोनवणे, विलास नारायण सोनवणे, विशाल प्रल्हाद सोनवणे, संजय प्रभाकर साळुंके, संजय गंगाराम साळुंके, माजी उपमहापौर भारती कैलास सोनवणे, नगरसेवक कैलास नारायण सोनवणे, सागर प्रल्हाद सोनवणे, आदेश नरेंद्र सपकाळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सर्व संशयीताना अटक झाली होती. त्यानंतर नरेंद्र सपकाळे, लक्ष्मी सपकाळे यांच्या व्यतिरीक्त सर्व संशयीत जामीनावर होते. या प्रकरणी न्यायाधीश अग्रवाल यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. त्यात सरकारतर्फे अॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी तर संशयितांतर्फे अॅड. प्रकाश बी. पाटील, अॅड. अकील इस्माईल, अॅड. आर. के. पाटील यांनी तर फिर्यादीतर्फे अॅड. मुकेश शिंपी, अॅड. बिपीन पाटील यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणी एकूण 30 साक्षीदार तपासले. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. त्यामुळे परिस्थितीजन्य पुराव्यांवर हा खटला सुरू होता. मात्र परिस्थिती जन्य पुराव्यांची साखळी पूर्ण झाली नाही. पुरावा पुरेसा नव्हता. त्यामुळे सर्व 13 संशयितांची मंगळवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली.