प्रशासकीय यंत्रणेला कंटाळून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

0

उस्मानाबाद : कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाने अवघा महाराष्ट्र अस्वस्थ असताना व यावर कर्जमाफीचा निर्णय घेण्याच्या सरकारच्या भूमिकेनंतरही काही शेतकरी आत्महत्येकडे वळत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. आता प्रशासकीय यंत्रणा सातबारावरील दुरुस्ती करून देत नाही, म्हणून माणिक मोराळे या शेतकर्‍याने आज थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून, या प्रकारामुळे पोलीस आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

सन 1942 साली माणिक मोराळेंचे वडील विश्‍वनाथ मोराळे दत्तकपुत्र झाले. त्यानुसार त्यांच्या नावे वाशी तालुक्यातील वडजी शिवारातील 150 एकर जमीन सातबारावर नोंदवली गेली. वडील हयात असताना सन 1992मध्ये अचानक दीडशेपैकी 94 एकरांच्या सातबारावरून वडिलांचे नाव कमी करण्याचा पराक्रम कळंबच्या तत्कालीन तहसीलदार आर. आर. गायकवाड यांनी केला. तेव्हापासून माणिक मोराळे यांचा न्यायालयीन लढा सुरू झाला. दरम्यान, 23 सप्टेंबर 2011 साली उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. प्रवीण गेडाम यांनी मोराळे यांच्या नावे सातबारावर दुरुस्ती करावी, असे आदेश दिले. मात्र, त्यानंतर त्यांची बदली झाली व दोन जिल्हाधिकारीही झाले व मात्र प्रकरणाची दखल घेतली नसल्याने नाही, असे लक्षात आल्यानंतर मोराळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले अन् आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.