प्रशासनाच्या अनास्थेमुळे महिलेचा बळी

0

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – 1985 सालापासून आजपर्यंत शहराचा विकास आराखडा कोलमडून पडला आहे. विकासाचे योग्य नियोजन प्रशासनाने न केल्यामुळे नागरिकांना वारंवार वेगवेगळ्या घटनांना तोंड द्यावे लागले आहे. वाढत्या शहरीकरणासोबतच सुनियोजित विकास होणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या वाढत्या अनास्थेमुळे पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई दरम्यान एका महिलेचा नाहक बळी गेला आहे, असे मत घर बचाओ संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी व्यक्त केले.

प्राधीकरणात असंतोष
याबाबत पत्रकात म्हटले आहे, की एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड अखत्यारीतील हजारो घरे प्रशासकीय दोषांमुळे गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळे गुरव, कासारवाडी या परिसरात बाधित होत आहेत. ही घरे नियमितीकरणासाठी पात्र कशी ठरतील याचा विचार प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाने केला पाहिजे. प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके ’एचसीएमटीआर क्षेत्रातील घरे वगळून’ अशी चुकीची बेजबाबदार पत्रे घर बचाव संघर्ष समितीस लेखी स्वरूपात पाठवत आहेत. यामुळे शहरातील प्राधिकरण बाधित नागरी रहिवाशी भागात मोठा असंतोष वाढत आहे.

‘रिंग रोड’ बाधितांना प्रश्‍न मिटवा
अशी दुर्दैवी घटना शहरात पुन्हा न घडण्यासाठी अनधिकृत तसेच ‘रिंग रोड’ बाधितांच्या घरांचा प्रश्‍न मिटणे आवश्यक आहे. बाधित घरे वाचवून पर्यायी मार्गाने रस्ता वळवण्यासाठी आता प्रशासनाने पावले उचलणे आवश्यक आहे. घरासाठी लोक आता टोकाची पावले उचलत आहेत, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. त्या मातेच्या दुर्दैवी अंतामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. अशी दुर्दैवी घटना पुन्हा न घडण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यानी 2017 च्या नियमितीकरण कायद्यात बदल करून नियम शिथिल करणे अत्यावशक असल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.