प्रशासनाच्या नाकावर टिच्चून जामनेरात दुकाने उघडली

जामनेर (प्रतिनिधी)- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जीवनावश्यक सेवांना वेळेचे निर्बंध घालून देण्यात आले आहे. असे असतांना जामनेर शहरात कापड, इलेक्ट्रॉनक, सलून, कटलरीसारखे व्यवसाय सुरू होते. नगरपालिका प्रशासनाकडुन या सर्व दुकानांना सील करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र रविवारी चक्क दुकानांना नोटीसरूपात लावलेले सील फाडुन प्रशासनाच्या नाकावर टिच्चून व्यापार्‍यांनी दुकाने उघडल्याचे चित्र दिसून आले.
जामनेर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी आदेशाची अंमलबजावणी करणेकामी जामनेर नगर परीषदेचे कोरोना प्रतिबंधक पथक स्थापन करून शहरातील दुकानांवर कायदेशिर कार्यवाही केली. यात जनरल, कटलरी, इलेक्ट्रॉनिक, कापड, सलून व इतर यांना परवानगी नसताना देखील उघडी ठेवली म्हणून काही दुकानं सील करण्यात आली. त्यावर मुख्यधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या स्वाक्षरीनिशी असलेली दुकाने सील केल्याच्या नोटीस फाडून शासनाचे आदेशाचे उल्लंघन करून दुकाने पुन्हा खुली केली. शासन, प्रशासन यांची भीती न बाळगता सर्रासपणे बंदी असलेले व्यवसाय कसे सुरू आहेत अशी विचारणा सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. तसेच नपा प्रशासन व संबंधीत अधिकारी या प्रकाराकडे कानाडोळा करीत आहे. गोरगरीब व्यवसायिकांवर ज्या तप्तरतेने कार्यवाही केली जाते तीच तप्तरता मोठ्या व्यवसायिकांना का लागू होत नाही अशी विचारणा नागरिक करीत आहे.