प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गुड मॉर्निंग पथकाला अपयश

0

जळगाव । स्वच्छ महाराष्ट्र अभियान आढावा बैठकीचे आयोजन 1 मार्च रोजी अवर सचिव मिलींद कुळकर्णी यांनी केली होती. या आढावा बैठकीत कुळकर्णी यांनी महानगरपालिकेद्वारे शहर हागणदारीमुक्त होतांना केलेली प्रगती असमाधानकारक असल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी तात्कलीन आयुक्त जीवन सोनवणे यांना 31 मार्चपर्यंत कसे हगणदारीमुक्त होणार याच्या आराखड्यासह बोलविले होते. परंतु, 31 मार्च पर्यंत शहर हगणदारीमुक्त न झाल्याने उपसचिव सुधाकर बोबडे यांनी 15 ऑगस्टपर्यंत शहर हगणदारीमुक्त करण्याची सूचना केली होती. यातही महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरल्याने 31 ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली आहे. प्रशासनान तयार केलेल्या गुड मॉर्निंग पथकात स्थानीक नगरसेकांचा समावेश केला नसल्याचा आरोप भाजपा नगरसेवक रविंद्र पाटील यांनी केला आहे.

स्थानिक नगरसेवकांना समाविष्ट करा
प्रशासनाने शहर हगणदारी मुक्त करतांना गुड मॉर्निंग पथक स्थापन केले आहे किंवा नाही हेच लक्षात येत नसल्याचे रविंद्र पाटील यांनी म्हटले आहे. गुड मॉर्निंग पथकात स्थानिक नगरसेवक, सेवाभावी संस्थेंचे प्रतिनिधी, नागरिकांचा समावेश प्रशासनाने केला नसल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या गुड मॉनिर्ंग पथकात 34 कर्मचार्‍यांचा समावेश असून यात पाणी पुरवठा, बांधकाम, आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

प्रशासन ढिम्माचा आरोप
सुधकार बोबडे यांनी 31 ऑगस्टपर्यंत शहर हगणदारीमुक्त न झाल्यास महापालिकेचे अनुदान बंद करण्यात येईल असा इशारा बोबडे यांनी दिला आहे. परंतु, प्रशासन याबाबत ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. गुड मॉर्निंग पथकाबाबत नगरसेवकांशी प्रशासन चर्चा करीत नसल्याचा आरोप रविंद्र पाटील यांनी केला आहे. शहरात उघड्यावर जाणार्‍यांचे 58 स्पॉट होते. यातील 50 स्पॉट हगणदारीमुक्त करण्यात आले आहेत. उर्वरीत 8 स्पॉट हगणदारी करण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

हगणदारी- मुक्तसाठी 13 दिवस बाकी
सत्ताधारी नेहमी लोकसहभागातून काम करून घेत असतांना गुड मॉर्निंग पथकात पालिका कर्मचार्‍यांसह इतरांचा समावेश करायला हवा होता अशी अपेक्षा रविंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. शहराचे अनुदान बंद होणार असतांना गुड मॉर्निंग पथकाबाबत सत्ताधारी व प्रशासन गंभीर नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. शहर हगणदारीमुक्त करण्यास केवळ 13 दिवस बाकी असतांना नगरसेवकांना विश्‍वासात घेतले जात नसल्याचेही रविंद्र पाटील आरोप केला आहे. हगणदारी मुक्तीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे रविंद्र पाटील यांनी सांगितले.