प्रशासनाबरोबरचे साटेलोटे उघड करणार्‍याला धमकी

0

बारामती । वाळूसम्राटांचे महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसोबत असलेले साटेलाटे उघड झाल्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई केलेल्या वाळूच्या गाड्यांची माहिती अधिकारात माहिती मागितल्याच्या रागातून धमकी दिल्याचा प्रकार घडला. या संदर्भात बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नीलेश पोपट निकम (रा. झारगडवाडी, ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात नानासाहेब काशिनाथ गोफणे (रा. सोनगांव, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी निकम याने गोफणे यांना मोबाईलवरून संपर्क साधून जीवे मारण्याची दिली. तहसिलदारांनी कारवाई करून दंड केलेल्या गाड्यांच्या संदर्भातील गैैरप्रकार उघड झाला. त्यानंतर ज्या वाळूमाफियांनी परस्पर गाड्या सोडवून नेल्या आहेत. त्यांची माहिती अधिकारीत माहिती मागवणार्‍यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. त्यातूनच गोफणे यांना धमकी देण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणाची पोलखोल करणारे किशोर मासाळ यांनी जिल्हाधिकार्‍यांना पुन्हा पत्र पाठवून ज्या गाड्या खोट्या आदेशानुसार सोडल्या आहेत, त्या वाहन मालकांवर गुन्हे दाखल करावेत, बनावट आदेशाचे पत्र तयार करून शासनाचा महसूल बुडवणार्‍यांची चौकशी करावी, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. तसेच शासनाचे चलन न भरता वाळू वाहतुकीच्या मालकांनी गाड्या सोडवल्या आहेत. त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत, असे निवेदनात म्हटले आहे.