प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदेना निलंबित करा –  शत्रुघ्न काटे 

0
पिंपरी चिंचवड : महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याकडे शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरणाची माहिती मागितली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. ‘मी माहिती देऊ शकत नाही’, असे उध्दटपणे त्यांनी उत्तर दिले. अधिकार्‍यांना एवढी मस्ती कशाला हवी. असे म्हणत ज्योत्स्ना शिंदे यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सर्वसाधारण सभेत केली. महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पाडली.
माहिती दडवण्यामागे गौडबंगाल...
एक महिन्यापूर्वी पती-पत्नी एकत्रीकरणासाठी आलेल्या अर्जांची माहिती मागितली होती. चारवेळा मोबाईलवर संपर्क साधून झाला. तरीही माहिती दिली नाही. शेवटी मी माहिती देऊ शकत नाही, असे उत्तर शिंदे यांनी दिले. माहिती देण्यास एवढी दिरंगाई का केली गेली. ही माहिती दडवण्यामागे काहीतरी गौडबंगाल आहे. याचा खुलासा ज्योत्स्ना शिंदे यांनी करावा, अशी मागणी काटे यांनी सभागृहात केली.
माहिती देण्याची लिपीकाची जबाबदारी…
प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाल्या, माहिती उपलब्ध करण्याची जबाबदारी संबंधित विभागातील लिपिकाची असते. त्यांच्याकडून जोपर्यंत माहिती समोर येत नाही. तोपर्यंत माहिती देऊ शकत नव्हते, म्हणून मी माहिती देऊ शकले नाही, असे उत्तर काटे यांना दिले, असा खुलासा करत शिंदे यांनी काटे यांचा आरोप फेटाळून लावला. त्यावर अधिकार्‍यांना माहिती दडवण्याचा अधिकार बिलकूल नाही. ज्योत्स्ना शिंदे यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी करत काटे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला.
काम जमत नसेल तर घरी पाठवा…
अधिकारी उपकार करत नाहीत. काम जमत नसेल तर त्यांना घरी पाठवा, अशी सूचनाही त्यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना केली. रहाटणीचे नगरसेवक चंद्रकांत नखाते आणि शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी मध्यस्ती केल्याने काटे यांनी आपली तलवार म्यान केली. परत, प्रशासनाकडून अशा चुका होणार नाहीत, असा समज संबंधित अधिकार्‍यांना देण्यात यावा, अशी सूचना यांनी यांनी केली.