प्रशासन नियोजनशुन्य असल्याचा आरोप

0

जळगाव । शहरात डेंग्यू, स्वाईन प्ल्फ्यू, मलेरीया यांच्या रूग्णात वाढ होत असल्याने स्थायीमध्ये सदस्यांनी रोष व्यक्त केला. ही सभा सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी उपायुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, शहर अभियंता दाभाडे, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते. शहरात सफाईचा मक्ता देतांना एक ठेका 2 लाख 78 हजार रूपयांना तर उर्वरीत ठेके हे 3 लाख 10 हजारांना देण्यात आलेले असतांना गोलाणी मार्केटच्या सफाईसाठी 4 लाखांचा ठेका का देण्यात आला याची विचारणा भाजपा नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी केली. याला उत्तर देतांना आरोग्य अधिकार डॉ. विकास पाटील यांनी गोलाणी मार्केटची दोन वेळेस साफसफाई व शौचालयांची सफाई करण्यात येणार असल्याने हा ठेका 4 लाखांना दिला असल्याचे सांगितले.

ठेक्यास भाजपाचा विरोध
सोनवणे यांनी गोलाणीचा ठेका देतांना मक्तेदारांशी तडजोड का करण्यात आली नाही असा प्रश्‍न उपस्थित केला. उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी स्पष्टीकरण देतांना सांगितले की, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी गोलाणी मार्केटची पहाणी केली असता मार्केटमध्ये सफाई नसल्याचे आढळून आले होते. यानुसार प्रभारी आयुक्तांनी गाळेधारकांशी चर्चा करून 1100 रूपये प्रती गाळेधारकांनी महापालिकेकडे जमा करण्याचे ठरविण्यात आले होते त्यानुसार गाळेधारकांच्या पैशातून काम करण्यात येत असल्याची माहिती दिली. याउत्तराने समाधान न झाल्याने पृथ्वीराज सोनवणे यांनी ठरावास भाजपाचा विरोध असल्याचे सभागृहात सांगितल्याने बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला. ठेका देतांना पारदर्शकता नसल्याचा आरापे यावेळी करण्यात आला.

वृक्षतोड कर आकारणीबाबत प्रश्‍न
भाजपाच्या उज्वला बेंडाळे यांनी वृक्षतोड करतांना 500 रूपयांची पावती घेण्यात येत असल्याचे सांगितले. उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी वृक्षतोड करण्याची परवानगी घेण्यासाठी पावती घेतली जात असल्याचे सांगितले. तर बांधकाम अभियंता सुनील भोळे यांनी महासभेने तसा ठराव केला असल्याचा स्पष्ट केले. शहरात वादळामुळे पडलेले झाडांच्या फांद्या उचलण्यात येत नसल्याचे मनसेच नगरसेवक अनंत जोशी यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. जोशी यांनी महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्ती किशोर राजे निंबाळकर यांनी चार प्रभांगासाठी तीन टॅक्टर लावण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. अ‍ॅबेटिंग व फॉगींगसाठी 100 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी केवळ 40 कर्मचारी शाहू महाराज रूग्णालयात हजर झाले होते. याठिकाणी महापौर ललित कोल्हे, अनंत जोशी देखील उपस्थित होते. 100 पैकी केवळ 40 कर्मचारी हजर झाल्याने महापौर कोल्हे यांनी जे कर्मचारी शनिवारी हजर होणार नाहीत त्या कर्मचार्‍यांना निलंबन करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती नगरसेवक अनंत जोशी यांनी दिली.

डेंग्यू सदृश आजाराचे 425 रूग्ण
शहरात डेंग्यू, मलेरीया, स्वाईन फ्प्लुचे रूग्ण आढळत असतांना कोणत्या पद्धतीने साफसफाई केली जात आहे असा प्रश्‍न पृथ्वीराज सोनवणे यांनी उपस्थित केला. मलेरीया विभागाचे एस. व्ही. पांडे यांनी मागील तीन दिवसांपूर्वीच चार्ज घेतला असून शहरात ज्या भागात डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्याआहेत त्या आदर्शनगर, रामानंद नगर आदी भागांमध्ये 8 कर्मचारी नियुक्त केले असल्याची माहिती दिली. तर प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी शहरात डेंग्यू सदृष्य 425 रूग्ण आढळले असून 43 नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे सभागृहास सांगितले. पृथ्वीराज सोनवणे यांनी अ‍ॅबेटिंग औंषध घेवून ठेवले असून त्याचा वापर केला जात नसल्याचा आरोप केला आहे. तसेच या औषधांची एक्सप्रायरी डेट दोन महिन्यांची असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याला पांडे यांनी दुजोरा दिला. शहरात नियोजन करून धुरफवारणी करण्यात येणार आहे. तसेच अ‍ॅबेटींग करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे पांडे यांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा असे आवाहन देखील करण्यात आले. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे पांडे यांनी सांगितले.

सहा महिन्यांपासून होती तक्रार
सोनवणे यांनी सहा महिन्यांपासून औषधांचा वापर किती केला आहे याची विचारणा केली. याला उत्तर देतांना आरोग्य विभागाचे सोनवाल यांनी अजब उत्तर दिले. सोनवाल यांनी सांगितले की, तेव्हा औषधांचे मोठ्या प्रमाणात वापर केला असता तर आज औषधसाठा शिल्लक राहिला नसता असा तर्क देत प्रत्येक महिन्याला 80 लिटर औषध वापरले गेल्याचे सांगितले.

पृथ्वीराज सोनवणे यांनी अ‍ॅबटिंग करणार्‍या कर्मचार्‍यांना देण्यात येणारे औषध तोकडे असल्याची तक्रार केली. एका तासातच हे औषध संपून जात असल्याने कर्मचार्‍यांना जास्त प्रमाणात औषधी दिली गेली पाहिजे अशी सूचना मांडली. दोन-चार महिन्यांपासून प्रशासन सुस्त असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला. बांधकाम विभागाचे ट्रॅक्टर अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता त्यावरील कर्मचारी रिकामेच बसलेला असतात त्यांना काम दिले जात नसल्याने प्रशासन योग्यप्रकारे नियोजन करीत नसल्याचा आरोप करीत प्रशासन नियोजन शुन्य असल्याचा ठपका ठेवला. प्रशासन काम करीत नसलयानेच ही आपतकालीन परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तर नवनाथ दारकुंडे यांनी त्याच्या वार्डांतील समस्या यावेळी मांडल्यात.

आपत्कालीन विभागात अनागोंदी
पृथ्वीराज सोनवणे यांनी आपत्कालीन विभागाला फोन केला असता तो लागत नाही लागलाच तर उचलला जात नसल्याची तक्रार केली. तसेच फोन उचललाच तर आवाज स्पष्ट येत नसल्याचे सभापतींच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आपात्कलानी विभाग प्रमुख वसंत कोळी यांनी आपात्कालीन नंबरवर फोन करून सभापती वर्षा खडके यांना दिला. सभापती खडके यांनी देखील स्पष्ट आवाज येत नसल्याच्या तक्रारीला दुजोरा देत सेवा सुधारण्याची सूचना केली. पृथ्वीराज सोनवणे यांनी आपत्कालीन विभागाबाबत नाराजी व्यक्त केली. आपत्कालीन परिस्थितीत हेल्प लाईन काही एक कामाची नसल्याचा आरोप सोनवणे यांनी केला. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सुविधा देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सोनवणे यांनी अधिकार्‍यांनी कार्यक्षमता वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

ताडपत्रीचा वापर नाही
खाविआ नगरसेविका ज्योती इंगळे यांनी निमखेडी शिवारातील घनकचरा प्रकल्पात कचरा नेण्यार्‍या टॅ्रक्टरवर वारंवार मागणी करूनही ताडपत्री टाकली जात नसल्याने संताप व्यक्त केला. आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी कचरा ट्रॅक्टरवर ताडपत्री टाकण्यात आली असल्याची माहिती दिली. तर नगरसेवक नितीन बरडे यांनी आरोग्य विभागाकडून 50 ताडपत्री खरेदी करण्यात आलेल्या असून त्या कुठे आहेत अशी विचारणा करत ट्रक्टरवर ताडपत्री दिसत नसल्याचा आरोप केला. याला उत्तर देतांना डॉ. विकास पाटील यांनी याची नोंद घेतो असे सांगितले. डॉ. पाटील यांच्या उत्तराने ज्योती इंगळे यांनी मी बोलणेच सोडले आहे अशी उद्विग्न होवून सांगितले. डॉ. पाटील यांनी त्या 50 ताडपत्री आरोग्य निरीक्षांना वाटप केल्या असल्याचे सांगून कारवाई करतो असे उत्तर दिले.