धुळे (ज्ञानेश्वर थोरात)। राज्यात नव्हे तर देशात विकासात अग्रेसर असलेला व शिरपूर पॅटर्नच्या प्रयोगाने नावारूपाला आलेला शिरपूर तालुका प्रशासनाच्या कुचराईमुळे महशूर होत चालला आहे. गेल्या 25 वर्षांपासून एक हाती सत्ता असलेला तालुका विकासाकडे वाटचाल करत असताना, शासनाच्या अनेक योजनांमध्ये लूट व जनतेची पिळवणूक करत असल्याचे भयावह चित्र स्पष्ट होत आहे. लोकप्रतिनिधी तालुक्याच्या विकासाची कास धरून वाटचाल करीत आहे. मात्र दुसरीकडे शासनाच्या योजनांमध्ये प्रशासन स्तरावर होणारा करोडो रुपयांचा भष्ट्राचाराकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. शासनाच्या विविध योजनांमध्ये निधीची अफरातफर करणार्यांवर दोष सिद्ध होऊन देखील अधिकार्यांच्या बचावा खातीर प्रशासनकडून जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जातो हे शिरपूर तालुक्याच्या जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
प्रशासकीय यंत्रणेवर लक्ष असावे म्हणून तालुक्यातील जनतेने येथील पंचायत समितीत 28 सदस्य निवडून दिले आहेत. मात्र लोकप्रतिनिधींचे ऐकतील ते अधिकारीच काय, त्यामुळे येथील अधिकारी, कर्मचार्यांची मुजोरी वाढली आहे. शेवटी तक्रारदाराला माघार घेण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून विनंती केली जाते. हा लोकप्रतिनिधींचा प्रशासनापुढे नाईलाज म्हणावा की अधिकार्यांची पाठराखण अशी संभ्रमावस्था येथील नागरिकांची झालेली दिसून येते.
सामान्य नागरीकांच्या तक्रारींची अधिकारी घेत नाही दखल
तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा भ्रष्ट अधिकार्यांच्या चूका लपवण्यासाठी कोणत्या हद्दी पर्यंत जाईल याची कल्पना करणेदेखील सामान्य माणसाला सोपे नाही. प्रशासनाची इतकी घाणेरडी व्यवस्था पाहून सामान्य नागरिकाला प्रशासकीय यंत्रणेवर विश्वास ठेवणे अवघड झाले आहे, तर न्याय मागावा कोणाकडे असा प्रश्न तालुक्याची जनता विचारू लागली आहे. बलकुवे गावातील जागृत नागरिकांनी शौचालय अनुदानात लाखोंचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. संबंधित भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी येथील नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करून मागणी केली होती. मात्र पंचायत समिती प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी कडे साफ दुर्लक्ष केले. अखेर संतप्त नागरिकांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. भ्रष्ट्राचार करणार्यांविरुद्ध सबळ पुरावे सादर करूनही संबंधित अधिकार्यावर गुन्हा दाखल होत नाही. त्यासाठी येथील डॉ.सरोज पाटील यांनी 7 दिवस उपोषण करून मरणाच्या खाईत स्वतःला लोटून द्यावे लागले. या दरम्यान प्रशासन तर झोपीच गेले होते, परंतु येथील लोकप्रतिनिधींच्या मेंदूला देखील झिंन झिण्या आल्या नाहीत. डॉ पाटील यांनी 7 दिवस अन्नपाणी शिवाय कोणताही उपचार न घेता जनतेच्या भल्यासाठी आणि प्रशासनातील चुकीच्या व्यवस्थेविरुद्ध जीवाची पर्वा केली नाही. अखेर आठव्या दिवशी प्रशासनाला गुडगे टेकायला मजबूर केले त्यामुळे सबंधितावर गुन्हे दाखल झाले.
अनेक योजनेत भ्रष्टाचार उघड
आजतागायत शिरपूर तालुक्यात गावपातळीवर राबविले जाणारे अनेक योजनांमध्ये भष्ट्राचार उघडकीस आला आहे. तालुक्यातील आदिवासी बहुल भागामध्ये राबवल्या जाणार्या शासनाच्या योजना घरकुल, शौचालय, पाणी पुरवठा, रोजगार हमी,जलयुक्त शिवार, फळबाग,शेत तळे, शैक्षणिक योजना,आरोग्य योजना, आदी सारख्या लोकहिताच्या योजनां राबवल्या जात असताना अनुदानात करोडोचा भष्ट्राचार झाल्याची माहिती येथील जागृत जनतेने माहितीच्या अधिकारा खाली उघड केली आहे. तर संबंधीतांवर कारवाई व्हावी म्हणून पंचायत समिती ते जिल्हा परिषद प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. दरम्यान प्रशासनाकडून आजतागायत ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.