नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी संचालक रवी शास्त्री यांच्यासह वीरेंद्र सेहवाग, वेंकटेश प्रसाद, टॉम मूडी, रिचर्ड पायबस, दोड्डा गणेश आणि लालचंद रजपूत यांनी अर्ज दाखल केल्यानंतर केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर वेस्ट इंडिजचे माजी प्रशिक्षक फिल सिमन्स यांनीही या शर्यतीत उडी घेतल्याने ही निवडणुक चुरशीची होणार असल्याचे संकेत आहेत. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची समिती प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असलेल्यांची मुलाखत घेणार असून कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष वेधले आहे. भारतीय क्रिकेटच्या प्रशिक्षकपदी कोण असावे याबाबत गेल्या काही दिवसांपासून विशेषत्वाने चर्चा सुरू होती. दरम्यानच्या काळात काही जणांची नावे चर्चे त होती. परंतु त्यामध्ये मोठीच वाढ झाली असल्याचे दिसून येते. त्याच विंडीजच्या सिमन्स यांनी अर्ज दाखल केल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.
जूनमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर अनिल कुंबळे यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. या स्पर्धेपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. कुंबळे यांची कारकिर्द यशस्वी ठरल्यामुळे या पदासाठी त्यांची फेरनिवड होणे जवळपास निश्चित होते. मात्र, कर्णधार विराट कोहली आणि कुंबळे यांच्यातील वादाची जाहीर चर्चा झाल्यानंतर कुंबळे यांनी कार्यकाळ संपल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे बीसीसीआयने अर्ज करण्याची मुदत 9 जुलैपर्यंत वाढविली आहे तरीही सध्या सुरू असलेल्या भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज येथे अनिल कुंबळे यांच्याशिवाय रवाना झाला आहे. त्यामुळे सध्या अनिल कुंबळे यांचे प्रशिक्षक पदावर केवळ नाममात्र अस्तित्व असून येणार्या भावी प्रशिक्षकाची क्रिकेट संघाला उत्सूकता लागून राहिली आहे.
फिल सिमन्सही शर्यतीत
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने रवी शास्त्री यांना अर्ज करण्यास सांगितले होते. कर्णधार विराट कोहलीच्या आग्रहावरून शास्त्री यांचे नाव या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. भारतीय संघ जुलैअखेरीस श्रीलंकेच्या दौर्यावर जाणार आहे. त्यापूर्वी नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती होईल, असे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले. फिल सिमन्स प्रशिक्षक असताना वेस्ट इंडिजने 2016 मध्ये ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. पण वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी हे पद सोडले. आता तेही या पदासाठी इच्छूक आहेत.