रमेश कारंडे धुळे । येथील गोंदूर विमानतळावरून सकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत वैमानिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विमाने उडवत असतात. सध्या दहावी,बारावीच्या परिक्षा सुरू असून विमानांच्या भर भर उडण्याच्या कर्कश आवाजामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलीत होत आहे. त्यामुळे याचा परिक्षेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या प्रतिक्रीया विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहेत. गोंदूर विमानतळावरील चार विमाने येथील वैमानिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थी दररोज सकाळी सहा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत संपुर्ण शहरभर उडवत असतात. विमानांचा कर्कश आवाजाने देवपूर परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तर सध्या दहावी बारावीच्या परिक्षा सुरू आहेत. परिक्षार्थी विद्यार्थ्यांना विमानांच्या आवाजामुळे अभ्यासात मन लागत नाही. तसेच पेपर सोडवतांना लक्ष विचलीत होत असल्याचे विद्यार्थी सांगतात. यामुळे विद्यार्थ्यांना एकीकडे परिक्षेची चिंता तर दुसरीकडे या विमानांच्या आवाजाने होणारा त्रास हा परिक्षेच्या निकालावर घातक परिणाम होण्याची शक्यता विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रीयेतून उमटत आहेत.
ज्येष्ठ नागरिक, बालकांना त्रास
शहरातील जेष्ठ नागरिक,वयोवृध्द व लहान बालके उन्हाच्या तडाक्यामुळे दुपारी घरातच विश्रांती करतात. मात्र या विमांनाच्या फेर्यांमुळे होणारा कर्कश आवाज त्यांची झोपमोड होते. त्यामुळे त्यांना मानसिक ,शारीरीक त्रास सहन करावा लागत आहे.
मी देवपूर भागात राहत असून दिवसभर उडणार्या या विमानांमुळे मला माझ्या लहान मुलाला सांभाळणे कठीण होते. नेमका तो झोपलेला असतो, आणि अचानक छतावरून विमान जाते. आणि त्या आवाजामुळे माझा मुलगा घाबरून झोपेतून जागा होऊन रडू लागतो. – प्रियंका कांबळे,गृहीणी
माझे दहावीचे पेपर सुरू आहेत. पेपर लिहत असतांना अचानक शाळेवरून विमान जातांना मोठा आवाज होतो. त्यामुळे लक्ष विचलीत होते. मग नंतर लवकर लिंक लागत नाही. त्यामुळे पेपर सोडवायला वेळ पुरत नाही. माझ्यासकट सगळ्याच मुलांचे असे हाल आहेत. म्हणून किमान परिक्षाकाळात तरी या विमानांना बंद ठेवावे. – रोहीत पाटील,विद्यार्थी
माझी बारावीची परिक्षा सुरू असून मी दुपारी किंवा इतर वेळेस अभ्यास करत असतांना आकाशात सारखा दिवसभर गोंगावणारा विमानांच्या आवाजामुळे माझे अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यामुळे माझे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. तरी या होणार्या त्रासापासुन सुटका मिळावी. – महेंद्र मारनर, विद्यार्थी
काही दिवसात आमच्या बी ई च्या परिक्षा आहे. त्यामुळे दुपारी अभ्यास करत असतांना क्षणातच घराच्या वरून एकदम कर्कश आवाज करून विमान जाते. त्यामुळे अचानक मनात धडकी भरते. आणि लक्ष विचलीत होते. अगदी या विमांनाच्या आवाजाचा वैताग आला आहे. – उमेश राम बोरकर